तुम्ही कर्जदार आहात काय?तुम्ही बँकेचे कर्ज फेडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानंतर मागील आठवडाभरात जवळपास 12 बँकांनी कर्जाचा दर वाढवला आहे. ( 12 Bank's Increased Interest Rate) त्यामुळे कर्जफेड आणखी जिकरीचे होणार आहे. नव्याने कर्ज घेणाऱ्यांना आता वाढीव कर्जाचा भार सोसावा लागेल.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने (SBI Raised Interest Rate) कर्जाचा दर (MCLR) 0.20% वाढवला आहे. यामुळे एमसीएलआरशी सलग्न कर्जे महागली आहेत.बँकेच्या वेबसाईटनुसार एमसीएलआर दर 7.70% इतका वाढला आहे. एप्रिलपासून एसबीआयने पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे.यातून एकूण 0.70% टक्क्याने कर्जाचा दर वाढला आहे. एप्रिल, मे आणि जुलै या महिन्यात बँकेने एमसीएलआरचा दर 0.10% वाढवला होता. त्यानंतर जूनमध्ये बँकेने कर्जदर 0.20% वाढवण्यात आला होता. 16 ऑगस्ट 2022 रोजी तो आणखी 0.20% वाढ करण्यात आली.
एसबीआयने रेपो दराशी सलग्न कर्जाचा दर (RLLR) देखील 0.50% वाढवला आहे. यानंतर तो 7.65% झाला आहे. महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने महिन्याच्या सुरुवातीला रेपो दरात 0.50% वाढ केली होती. यामुळे रेपो दर 5.40% इतका झाला आहे. एप्रिलपासून रेपो दर 1.40% वाढला आहे. यानंतर जवळपास सर्वच बँकांनी कर्जदरात वाढ केली आहे. यात बँकांचे कर्ज सरासरी 2% पर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे.
गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जाच्या व्याजदरात वाढ झाली आहे. बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ इंडिया, पीएनबी बँक, येस बँक या बँकांनी कर्जाचा दर 0.05% ते 0.10% या दरम्यान वाढवला आहे. गृह कर्जात बँक ऑफ बडोदाचा 7.45% हा सर्वात कमी व्याजदर आहे तर आयसीआयसीआय बँकेचा 8.85% हा सर्वाधिक होम लोन रेट आहे.