जेव्हा तुम्ही पर्सनल लोन घेता त्यावेळी प्रामुख्याने व्याजाचा दर, प्रोसेसिंग फी आणि अन्य प्रकारच्या चार्जेसबाबत विचारपूस करता. पर्सनल लोनसाठी फोर-क्लोजर आणि प्री-पेमेन्ट असे दोन महत्त्वाचे मुद्दे असतात. मात्र, या मुद्द्यांवर बहुतांश कर्जदार चर्चा करत नाहीत. खरे तर या मुद्द्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक असते.
* पर्सनल लोन म्हणजेच व्यक्तिगत कर्ज खाते तीन प्रकारे बंद होते. पहिला प्रकार म्हणजे रेग्युलर क्लोजर. या प्रकारात बँकेचा ग्राहक नियमितपणे कर्जाचे हप्ते (ईएमआय) भरत राहतो. निश्चित मुदतीमध्ये जेव्हा पूर्ण पेमेन्ट होते, तेव्हा ईएमआय बंद होतो. या प्रकारात शेवटचा हप्ता भरल्यानंतर बँकेशी संपर्क साधावा आणि लोन क्लोजर करून घ्यावे. घरबसल्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करूनसुद्धा ही प्रक्रिया करता येते. तसेच बँकेला ई-मेल पाठविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. क्लोजरमध्ये अडथळा येत असेल तर ई-मेलच्या माध्यमातून तक्रार करून काम करून घेता येते.
* दुसरा प्रकार प्री-क्लोजर हा असतो. जेव्हा एखादी व्यक्ती कर्जाची मुदत संपण्यापूर्वीच पूर्ण रक्कम भरून कर्जफेड करते, तेव्हा त्याला प्री-क्लोजर म्हणतात. काही बँका आणि संस्था प्री-क्लोजरसाठी शुल्क आकारतात. अर्थात तरीही अनेकवेळा वाढता व्याजदर आणि कर्जाचे ओझे या दोहोंमधून या प्रकारातील परतफेडीमुळे मुक्तताच मिळते. बँकांमध्ये कर्जासाठी वेगवेगळे लॉकिंग पीरियड असतात. त्याच्या आधी कोणतीही व्यक्ती कर्ज खाते बंद करू शकते. व्याज बुडाल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी बँका प्री-क्लोजर शुल्क घेतात. यासंदर्भात वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम असतात. त्यामुळे या बाबतीत विशिष्ट माहिती घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या कर्मचार्यांशी किंवा कस्टमर केअर सेवा अधिकार्यांशी बोलावे लागेल. सध्या अनेक बँका प्री-क्लोजरच्या बाबतीत कोणतेही शुल्क आकारत नाहीत.
* पार्ट पेमेन्ट म्हणजे अंशतः परतफेड हा आणखी एक पर्याय असतो. आपल्याला आपल्या कर्जाची परतफेड लवकरात लवकर व्हावी असे वाटत असेल, तर मधून-मधून अंशतः परतफेड करता येते. याचे दोन फायदे होतात. अंशतः कर्जफेड केल्यामुळे तुमचा ईएमआय लहान होतो किंवा कर्जफेडीची मुदत कमी होते. यातील कोणताही पर्याय आपण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार निवडू शकतो. याव्यतिरिक्त दुसरा फायदा असा की, अंशतः परतफेड ही मधून-मधून कितीही वेळा करता येते.
हे आवर्जून वाचा !
* ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, जर अंशतः परतफेड किंवा प्री-पेमेन्ट क्लोजर करताना बँकेने काही शुल्क आकारलेच तरी व्याज वाचल्यामुळे एकंदरीने मिळणारा फायदा त्या शुल्कापेक्षा कितीतरी अधिक असतो.
* अर्थात, प्री-पेमेन्टच्या बाबतीत आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत असे आहे की, या घटकाचा तातडीचा कोणताही परिणाम होत नसला, तरी दीर्घकालीन विचार करता कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, तुमचा क्रेडिट स्कोअर पहिल्यापेक्षा बराच अधिक असेल, तर हा पर्याय निवडणे चांगलेच ठरते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारत नसेल, तर अशा वेळी प्री-क्लोजरच्या पर्यायापासून दूर राहणेच चांगले.