Railway Rules: तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेल. रेल्वेकडून एसी डब्यातून प्रवास करणाऱ्यांना चादर, उशी, टॉवेल यासारख्या जीवनावश्यक वस्तू वापरायला मिळतात. मात्र अनेकदा प्रवासानंतर लोक या वस्तू घरी घेऊन जातात हे रेल्वेच्या निदर्शनास आले. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या वस्तू रेल्वे प्रवासादरम्यान तुमच्या सोयीसाठी दिलेल्या असतात. त्या घरी घेऊन जाणे म्हणजे पुढच्या वेळी तुम्हालाच गैरसोय करून घेणे होय.
किती भरावा लागतो दंड?
एखादा प्रवासी असे करताना आढळल्यास रेल्वेच्या नियमांनुसार त्याला तुरुंगात टाकले जाऊ शकते किंवा दंड होऊ शकतो. रेल्वे मालमत्ता कायदा 1966, (Railway Property Act, 1966) नुसार जर तुम्ही ट्रेनमध्ये ठेवलेला कोणताही माल चोरला किंवा नेला तर पहिल्या घटनेत एक वर्षाचा तुरुंगवास किंवा 1000 रुपये दंड होऊ शकतो. दुसऱ्यांदा पकडल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंड होऊ शकतो.
जर एखाद्या व्यक्तीने हे काम वारंवार केले तर त्याला दंडासह 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आयपीसीच्या कलम 378 आणि 403 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे अहवाल रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनला दिले जात आहेत. या अहवालांमध्ये, ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी प्रवास पूर्ण झाल्यानंतर चादर, टॉवेल इत्यादी सोबत कसे घेऊन जातात हे सांगितले आहे. अशाप्रकारे रेल्वेच्या मालमत्तेशी छेडछाड केली असेल तर तुम्हाला त्याबद्दल गंभीर शिक्षा भोगावी लागू शकते.
आता पर्यंत किती चोरी झाली असेल?
पश्चिम रेल्वे झोनने गेल्या वर्षी एक आकडा जाहीर केला होता, त्यानुसार 2017 ते 2018 या कालावधीत 1.95 लाख टॉवेल, 81776 चादरी, 5038 उशा आणि 7543 ब्लँकेट चोरीला गेले होते. आता त्याचे प्रमाण अधिक वाढले असल्याने या आकड्यात वाढ झाली असेल.
(News Source: https://zeenews.india.com)