शेती बिनभरवशाचा व्यवसाय मानला जातो. यातून कधीतरी फायदा मिळतो; पण शेतकऱ्याला नुकसान मात्र वेळोवेळी सहन करावे लागते. त्यामुळेच शेती करणं हे जिकरीचे आणि धाडसाचे काम मानले जाते. तंत्रज्ञान, विज्ञानाने कृषि क्षेत्रात बरीच प्रगती केली. त्याचा फायदा ही शेतीला होत आहे. पण नैसर्गिक आपत्तीपुढे सर्वजण हतबल होतात. त्याला शेतकरीही अपवाद नाही. त्यामुळेच बरेच जण शेतीला हा जोखमीचा व्यवसाय म्हणतात. चार दाणे टाकून भरघोस पीक (Crop) घेता येतं, असा भ्रम पसरवाऱ्यांनी एकदा शेती करुन पहावीच, असंही गंमतीने म्हटले जाते. तर शेतीत जोखीम असल्याने बऱ्याचदा सरकारला शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी (loan waiver) योजना राबवावी लागते. तसेच पीक कर्जही (Crop Loan) द्यावे लागते.
Table of contents [Show]
शेती जोखमीचा व्यवसाय!
शेती हा जोखमीचा व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना फायदाही फार मोठा होत असेल, हे 100 टक्के सत्य नाही. शेतकऱ्यांना पीकं घेण्यासाठी, त्याच्या व्यवस्थापनासाठी भरपूर आणि वेळोवेळी पैसा लागतो. हा पैसा प्रत्येकवेळी शेतकऱ्याकडे असेलच असे नाही.अशावेळी शेतकरी बॅंकांकडून पीक कर्ज घेतात. प्रत्येक जिल्ह्यात, तालुका आणि गावासाठी पीक कर्ज उपलब्ध असते. तिथलं जिल्हा प्रशासन यासंबंधीचा निर्णय घेत असते.
पीक कर्ज परतफेड!
शेतकऱ्यांना सरकार पीक कर्ज उपलब्ध करुन देते. अल्पव्याजदराने पीक कर्ज मिळते. त्यासाठी जिल्हा प्रशासन पीक कर्ज अर्ज उपलब्ध करुन देते. पीक कर्ज परतफेडीचा कालावधी कमी असतो. पीक कर्ज वेळेत परतफेड केल्यास सरकार व्याजदरात सवलत देते.
ऑनलाईनची अर्ज करण्याची सुविधा!
तुमची शेती कोणत्याही तालुक्यात असू द्या. तुमच्या जिल्ह्यात पीक कर्जाची सुरुवात झाली की, त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येते. जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर म्हणजे जिल्ह्याच्या नावे असलेल्या वेबसाईटवर, उदाहरणार्थ (aurangabad.nic.in) ऑनलाईन क्रॉप लोन अॅप्लिकेशन (Online Crop Loan Application) देण्यात येते. एवढेच नाही तर बँकांद्वारे, कृषी विभागाद्वारे यासंबंधीची माहिती देण्यात येते. काही गावात सरकारकडून किंवा प्रशासनाकडून शिबिरं घेतली जातात.
पीककर्ज देणाऱ्या बँका!
सेवा सहकारी बँका, सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज मिळते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करु शकतात.
पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- 8 अ
- जमीनीचा नकाशा
- आधार कार्डची प्रत
- शेत मालकाचे 3 फोटो
- स्टॅम्प (कर्ज रक्कमेनुसार 100 रुपयांचे स्टॅम्प लागतात)
पीक कर्जासाठी कर्जाच्या रक्कमेनुसार कागदपत्रांची मागणी बॅंकेकडून केली जाते. काही जिल्ह्यात 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी अथवा शून्य टक्के व्याजदराने देण्यात येते. हा पीक कर्ज वाटपाचा पॅटर्न राज्यभरात समान पद्धतीने राबविण्यात येतो.