Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Namo Drone Did Scheme: यातून महिलांना रोजगार कशाप्रकारे मिळेल? वाचा

NAMO Drone Didi Scheme

Image Source : https://www.freepik.com/

केंद्र सरकारद्वारे नमो ड्रोन दीदी योजना राबविली जात आहे. या अंतर्गत देशभरातील 15 हजार महिला बचत गटांना ड्रोनचे वाटप केले जाणार आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होईल.

देशाच्या आर्थिक विकासामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असते. यामुळेच केंद्र सरकारकडून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. प्रामुख्याने कृषि क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. याच उद्देशाने केंद्र सरकारद्वारे ‘नमो ड्रोन दीदी योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांना ड्रोनचे वाटप केले जाणार आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करता येईल.

‘नमो ड्रोन दीदी योजना’ नक्की काय आहे व या योजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होईल, ते समजून घेऊया.

नमो ड्रोन दीदी योजना काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे नमो दीदी ड्रोन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. याआधी त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देखील महिलांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, याबाबत माहिती दिली होती.

या योजनेंतर्गत 15 हजारांपेक्षा अधिक महिला बचत गटांना ड्रोनचे वाटप केले जाणार आहे. याशिवाय, महिलांना हे ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. योजनेच्या माध्यमातून 2024-25 आणि 2025-26 या दोन वर्षाच्या कालावधीत महिला बचत गटांना वितरित केले जाईल. या योजनेसाठी 1,261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत

ड्रोन खरेदी करण्यासाठी महिला बचत गटांना सरकारद्वारे आर्थिक मदत देखील केली जाणार आहे. प्रत्येक महिला बचत गटांना ड्रोन व इतर उपकरणं खरेदी करण्यासाठी 8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाईल. तसेच, ड्रोनची किंमत जास्त असल्यास कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) अंतर्गत बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होईल. तसेच, कर्जावरील व्याजदरात सरकारकडून अनुदान देखील देण्यात येईल.

कृषि मंत्रालयाने माहिती दिली की, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे पात्र बचत गटातील महिलांची निवड केली जाईल. तसेच, खत कंपन्यांच्या माध्यमातून ड्रोन पायलट व खते, कीटकनाशकांच्या फवारणीचे 15 दिवस प्रशिक्षण दिले जाईल. 

ग्रामीण भागातील महिलांना मिळेल रोजगार 

नमो ड्रोन दीदी योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक कमाईचे अतिरिक्त माध्यम उपलब्ध व्हावे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करता यावी हा आहे. बचत गटातील महिला हे ड्रोन शेतकऱ्यांना शेतीसाठी भाडेतत्वावर देऊन कमाई करू शकता. या माध्यमातून वर्षाला जवळपास 1 लाख रुपयांची कमाई होऊ शकते.

सर्वसाधारणपणे, एक एकर शेतीच्या कीटकनाशके फवारणीसाठी 500 ते 1000 रुपये घेतले जातात. अशाप्रकारे, दरवर्षी या माध्यमातून मोठी कमाई होऊ शकते. यामुळे महिला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनतील. 

सध्या स्वतः व ट्रॅक्टरच्या मदतीने खतं व कीटकनाशकांची फवारणी केली जाते. मात्र, ड्रोनच्या मदतीने ही कामे लवकर होतील. अशाप्रकारे, आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत मिळेल. एवढेच नाही तर ड्रोन पायलट, मॅकेनिक व स्पेअर-पार्ट्सची विक्री करणाऱ्यांसाठी रोजगार उपलब्ध होईल.