आयसीआयसीआय बँकेनं (ICICI Bank) व्हिडिओकॉन (Videocon) कंपनीला चुकीच्या पद्धतीने कर्जं (Loan Scam) दिल्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) आपली व्याप्ती वाढवली आहे. या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) तेव्हाच्या अध्यक्ष चंदा कोचर (Chanda Kochhar) त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochhar) तसंच व्हिडिओकॉन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व्ही एन धूत (Venugopal Dhoot) यांना सीबीआयने पूर्वीच अटक केली आहे. चंदा कोचर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओकॉन कंपनीला 350 कोटी आणि 750 कोटी रुपयांची कर्ज बँकेकडून दिली गेली.
आणि ही कर्ज देताना घोटाळा झाल्याचं हे अख्खं प्रकरण आहे. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तपास करत आहे. आणि कोचर पती-पत्नी तसंच वेणुगोपाळ धूत यांच्या चौकशी दरम्यान सीबीआयला कर्जाची आणखी दहा संदिग्ध प्रकरणं आढळली आहेत. त्यामुळे या प्रकरणांची चौकशीही संस्थेकडून होणार आहे.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर उद्योजक आहेत. आणि सुप्रीम एनर्जी लिमिटेड ही कंपनी चालवतात. व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाळ धूत यांच्याबरोबर त्यांचे काही औद्योगिक करार झाले आहेत. आणि या दोघांनी चंदा कोचर यांच्याबरोबरच्या संबंधांचा फायदा उचलत आयसीआयसीआय बँकेकडून गैरमार्गाने कर्जं उचलल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे. 2009 ते 2011 काळात मोठ्या रकमेची कर्जं व्हिडिओकॉनला देण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे कर्ज म्हणून उचललेल्या पैशातून देशाबाहेरही व्यवहार झाल्याचा सक्तवसुली संचलनालयाचा आरोप आहे. आणि त्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीही सुरू आहे. त्या प्रकरणात, चंदा यांचे पती दीपक कोचर यांना एकदा ईडीने अटकही केली होती.
हे प्रकरण उघड झाल्यानंतर चंदा कोचर यांना 2018 मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागला. आणि पुढे 2019 मध्ये बँकेनं त्यांना सर्व पदांवरून हटवलं. स्वत: चंदा कोचर यांनी त्यांच्यावर होणारे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
30 डिसेंबरला चंदा आणि त्यांचे पती दीपर कोचर यांना या प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.