अगदी 2000 च्या नव्या सहस्त्रकातही मुंबईतले (Mumbai) श्रीमंत लोक, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मोठ्या पदावरचे लोक दक्षिण मुंबईत राहतात. आणि मध्यमवर्गीय (Urban Middleclass) हळू हळू चाळीतली घरं विकून उपनगरांमध्ये (Mumbai Suburbs) राहायला गेलाय असंच चित्र होतं. पण, आता मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे सगळेच उपनगरांच्या दिशेनं जाताना दिसतायत. मुंबईची नवी ओळख दक्षिण मुंबई (South Mumbai) नाही तर पश्चिम उपनगरं (Western Suburbs) बनलीत. हा बदल मुंबईत कसा होत गेला ते पाहूया…
मुंबईची अख्खी अर्थव्यवस्था ब्रिटिशांच्या काळापासून आणि पुढे स्वातंत्र्यानंतरही इथल्या कपड्यांच्या मिल आणि त्यांना वित्त पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्था यावर आधारित होती. या सगळ्या मिल किंवा गिरण्या मध्य मुंबईत होत्या. त्याच्या अवती भवती गिरणीत काम करणारा मराठी मजूर वर्ग स्थायिक होत गेला. गिरण्या फक्त मुंबईच्या आर्थिक नाड्याच नव्हत्या तर ती मुंबईची संस्कृतीही होती.
पण, 1990 पासून पुढे हळू हळू गिरण्या बंद होत गेल्या. तिथलं काम थांबलं पण, गिरण्यांकडेही एक मोठी मालमत्ता होती तिथली जमीन. या जमिनींवर मोठ मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहू लागले. आणि तिथेच दक्षिण मुंबई पहिल्यांदा मध्य मुंबईच्या दिशेनं सरकली. कामगार वर्ग आधीच उपनगरांकडे सरकू लागला होता.
मुंबईचा हा पश्चिमेकडच्या प्रवासातले महत्त्वाचे चार टप्पे आणि कारणं बघूया…
Table of contents [Show]
वांद्रे-कुर्ला संकुलाचा विकास
दहा वर्षांपूर्वी महत्त्वाच्या सगळ्या कंपन्यांची मुख्य कार्यालय ही दक्षिण मुंबईत असायची. हा अलिखित नियमच होता. पण, हळू हळू वांद्रे कुर्ला संकुलाचा विकास झाला आणि ही परिस्थिती बदलली. हे संकुल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळालाही तुलनेनं जास्त जवळ होतं. आणि त्यातून उत्तर मुंबई हे नवं औद्योगिक क्षेत्र विकसत गेलं.
आताच्या घडीला वांद्रे-कुर्ला संकुलातले दर हे दक्षिण मुंबईपेक्षा 75% जास्त आहेत. आणि फक्त हे औद्योगिक केंद्रच नाही तर आजू बाजूला अनेक छोट्या औद्योगिक केंद्रांचा उदय झाला. कार्यालयीन कामासाठी दक्षिण मुंबई गाठण्याची गरजच कमी झाली. आणि यातून पश्चिम उपनगरांचा विकास होत गेला.
जागेची उपलब्धता, नवे गृहप्रकल्प
उपनगरांच्या विस्तारासाठी महत्त्वाचं कारण होतं तिथली मोकळी जागा. दक्षिण मुंबईत एका बाजूला समुद्र होता. आणि समुद्रामुळे नजीकच्या इमारतींना उंचीची मर्यादाही होती. त्यामुळे तिथे जागेची अभूतपूर्व टंचाई 1991 च्या दशकात जाणवू लागली. देशाची अर्थव्यवस्था खुली झाली होती. बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात येऊ इच्छित होत्या. पण, त्यांना जागा हवी होती.
त्या गरजेतूनच खरंतर वांद्रे-कुर्ला संकुलाचा विकास झाला. आणि रहिवासी वसाहतीही उपनगरांकडे सरकत गेल्या. कारण, तिथे आधीच उपलब्ध असलेल्या जागा विकासक आणि बिल्डरनी ताब्यात घेतल्या. आणि आधुनिक पद्धतीची नवीन सुखसोयींनी युक्त घर नवश्रीमंत मुंबईकरांना देऊ केली. या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये स्विमिंग पूल, जिम, बागा, उद्यानं अशा सोयी होत्या. तेवढी जागा दक्षिण मुंबईत नव्हतीच. आणि जुन्या इमारतींमध्ये या सगळ्या सुखसोयी नव्हत्या. त्यामुळे बहुतेक कंपन्या जशा उपनगरांत आल्या तशाच रहिवासीही उपनगरात आले.
अर्थव्यवस्था खुली झाल्यावर तरुणांना विकासाच्या नवीन संधी मिळाल्या. त्यातून मुंबईतला कनिष्ठ मध्यमवर्गीय आता वरच्या स्तरावर आला. त्यांना नव जग चांगल्या सुविधा खुणावत होत्या. चाळींमध्ये राहण्याची त्यांची तयारी नव्हती. पश्चिम उपनगरातले कमी गृहप्रकल्प दर आणि मिळणाऱ्या सुविधा यामुळे हा वर्ग पश्चिम उपनगरांकडे वळला.
गृह प्रकल्पांमधली वाढती व्यावसायिकता
या काळात मुंबईतलं रिअल इस्टेट क्षेत्रही विस्तारत होतं. आणि त्यात आधुनिकता येत होती. आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी योग्य वेळेत त्यासाठी आवश्यक नियामक यंत्रणाही मुंबई महानगरपालिकेकडून तयार करण्यात आली. त्यामुळे मोठे विकासक आणि त्यांच्या टाऊनशिप पश्चिम उपनगरांमध्ये वसत गेल्या. दक्षिण मुंबई सोडू इच्छिणाऱ्यांची चांगली सोय उपनगरांमध्ये झाली.