Residential prices: जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर जास्त पैसे मोजायला तयार राहा. कारण, घरांच्या किंमती जुलै-सप्टेंबर तिमाहीत 5.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दसरा-दिवाळी तोंडावर आली असताना घर खरेदीत तेजी राहणार असल्याचे दिसत आहे. एप्रिल-जून तिमाहीशी तुलना करता ही दरवाढ आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी
कोरोना काळात रिअल इस्टेट क्षेत्र मंदीत सापडले होते. मात्र, कोविड ओसरल्यानंतर नागरिकांनी घर खरेदीचा सपाटा लावला, तो अद्यापही कमी झालेला नाही. नव्या घरांसोबतच भाड्याने घर घेणं सुद्धा महाग झालं आहे. घरांची मागणी वाढत असताना पुरवठा मात्र, रोडावल्याचे मॅजिक ब्रिक्स या रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनीने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.
घरांची मागणी वाढली
मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, पुणे सह देशातील प्रमुख 13 शहरांतील घरांच्या किंमती 5.4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर जुलै-सप्टेंबर तिमाहीत मागील तिमाहीच्या तुलनेत घरांची मागणी 8.4 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा मात्र, 7.2 टक्क्यांनी कमी झाला आहे.
आलिशान घरांची मागणी वाढली
नोयडा, ग्रेटर नोयडा, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद सारख्या मेट्रो शहरांमध्ये आलिशान घरांची मागणी वाढत आहे. 3BHK आणि त्यापुढील घरांची मागणी 52 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच 2 BHK घरांची मागणीही वाढली आहे. कमी उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणारी 1BHK घरे बाजारातून गायब झाली आहेत. मागणी आणि पुरवठा दोन्हीही रोडावला आहे.
घरांच्या किंमती वाढण्यामागील कारणे काय?
देशातील सर्वच प्रमुख शहरांतील घरांची मागणी वाढत आहे. शहरी भागातील जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच प्रत्येक राज्याचे रेरा कायदे दिवसेंदिवस कठोर होत आहेत आहेत. त्यामुळे विकासकांना कायद्याचे पालन करताना अधिक खर्च होत आहे. तसेच कच्चा माल आणि मनुष्यबळाचा खर्च देखील वाढला आहे. तसेच पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यानेही किंमती वाढल्या आहेत.