नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याने आर्थिक निर्णय घेताना त्यांच्या मताला देखील प्राधान्य दिले जाते. प्रामुख्याने मोठी गुंतवणूक करताना महिलांचा निर्णय महत्त्वाचा असतो. रिअल इस्टेट खरेदीच्या निर्णयात देखील त्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरतो.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना अनेक फायदे देखील मिळतात. त्यामुळे अनेकजण त्यांच्या नावावर मालमत्ता खरेदी करण्यास प्राधान्य देतात. या लेखातून महिलांना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास कोणते फायदे मिळू शकतात, याविषयी जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना मिळतात हे फायदे
स्टॅम्प ड्युटी | स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्क हे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवर आकारला जाणारा कर असतो. सर्वसाधारणपणे 6 ते 8 टक्क्यांपर्यंत मुद्रांक शुल्क आकारले जाते. मुद्रांक शुल्काची रक्कम ही मालमत्तेच्या किंमतीनुसार ठरते. मात्र, महिलांच्या नावाने मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळते. महाराष्ट्रात महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात जवळपास 1 टक्के सवलत सरकारकडून दिले जाते. अशाप्रकारे, महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्क स्वरुपात भरावी लागणारी मोठी रक्कम वाचवू शकता. |
कर्ज व व्याजदरात सवलत | सर्वसामान्यांना घर खरेदी करताना कर्जाशिवाय पर्याय नसतो. लाखो रुपये एकाचवेळी गुंतवणे शक्य नसल्याने गृहकर्ज हाच पर्याय असतो. मात्र, महिलांच्या नावाने गृहकर्ज काढल्यास अनेक फायदे मिळतात. बँका व वित्तीय संस्था महिलांसाठी विशेष योजना व ऑफर्सची देखील घोषणा करतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठीचा गृहकर्जावरील व्याजदर हा 0.20 ते 0.50 टक्के कमी असतो. याशिवाय, कर्ज परतफेडीचा कालावधी देखील महिलांसाठी जास्त असतो. |
करात सवलत | पती व पत्नी दोघांना संयुक्तपणे मालमत्ता खरेदी केल्यास त्यांना करात सवलत मिळते. कलम 80 C, 24 , आणि कलम 80 EE आणि 80 EEA अंतर्गत गृहकर्जाच्या परतफेडीवर दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा फायदा मिळू शकतो. |
सरकारी योजनांचा फायदा | महिलांना संपत्तीमध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. महिलांच्या नावावर मालमत्ता असल्यास अशा योजनांचा फायदा घेता येतो. पंतप्रधान आवास योजना, क्रेडिट लिंक्ड सबसीडी स्किमसह अनेक फायदे मिळतात. याशिवाय, बँक व हाउसिंग फायनान्स कंपन्यांच्या योजनांचाही फायदा घेऊ शकता. |
नियमित उत्पन्न | रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास हे नियमित उत्पन्नाचे माध्यम ठरू शकते. मालमत्ता खरेदी केल्यानंतर तुम्ही भाड्याने देऊ शकता. यातून तुम्हाला दरमहिन्याला नियमित उत्पन्न मिळत राहील. यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत मिळेल. याशिवाय, मालमत्तेची किंमत ही दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्याने आर्थिक सुरक्षा देखील प्राप्त होते. |