आर्थिक व्यवहार करताना वेगवेगळ्या कार्ड्सचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचा वापर, ते कार्ड देणाऱ्या संस्था, बॅंका आणि त्याचा वापर यावर कार्ड्सचे वर्गीकरण केले जाते. मार्केटमध्ये सध्या 4 प्रकारचे कार्ड्स उपलब्ध आहेत. यामध्ये डेबिट कार्ड (Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card), प्रीपेर्ड कार्ड (Prepared Card) आणि इलेक्ट्रॉनिक कार्ड (Electronic Card) हे आहेत.
Table of contents [Show]
हे कार्ड कोण प्रसिद्ध करतं?
डेबिट कार्ड हे बॅंकांद्वारे ग्राहकांना दिले जाते आणि हे कार्ड बॅंक खात्याशी जोडलेले असते. क्रेडिट कार्ड हे साधारणत: बॅंका आणि काही नॉन-बॅंकिंग संस्थांद्वारे दिले जाते. पण आता काही अधिकृत संस्थाही क्रेडिट कार्ड देत आहेत. प्रीपेड कार्ड हे बॅंक आणि नॉन-बॅंकिंग कंपन्यांद्वारे दिले जाते. प्रीपेड कार्ड कार्ड किंवा वॉलेटच्या रूपात केलेल्या कार्डमधून आगाऊ रक्कम दिली जाऊ शकते. तर इलेक्ट्रॉनिक कार्ड किंवा ई-कार्ड हे ई-कॉमर्स व्यवहारांसाठी तयार केलेले मर्यादित डेबिट कार्ड (Limited Debit Card) आहे.
डेबिट कार्डचा फायदा काय?
डेबिट कार्ड (Debit Card) हे एक असे कार्ड आहे; ज्याद्वारे रोख पैशांऐवजी व्यवहार करता येतो. आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डेबिट कार्ड हे पैसे देण्याचा किंवा खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. ग्राहक जेव्हा बॅंकेत खाते उघडतात तेव्हा बॅंकेकडून ग्राहकाच्या मागणीनुसार किंवा आता सर्वच बॅंका ग्राहकांना डेबिट कार्ड देतात. डेबिट कार्डने व्यवहार केल्यावर लगेच बॅंकेतून पैसे कट होतात. त्याचा मॅसेजसुद्धा कार्डधारकाच्या मोबाईल नंबरवर येतो. डेबिट कार्डचा वापर करून एटीएमद्वारे (Automated Teller Machin-ATM) कधीही पैसे काढता येतात. रोख पैसे काढण्यासाठी बॅंकेत जावे लागत नाही.
क्रेडिट कार्डचा उपयोग काय?
क्रेडिट कार्ड (Credit Card) एक फायनान्शिअल इन्स्ट्रुमेंट किंवा एक पर्याय आहे ज्यात तुम्हाला आगाऊ रक्कम (क्रेडिट) मंजुर असते आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला व्यवहार करणे शक्य होते. जवळपास बहुतांश बँकांकडून खातेदारांना क्रेडिट कार्ड इश्यू केले जातात. यात काही हजारांची मर्यादा असते जी ग्राहक कुठेही खर्च करु शकतो. क्रेडिट कार्डचे बिल प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम विशिष्ट कालावधीत ग्राहकाला परत फेड करता येते. मात्र निर्धारित वेळेत भरली नाही तर मात्र क्रेडिट कार्डधारकाला विलंब शुल्क व्याजाच्या स्वरुपात भरावे लागते.
कार्डद्वारे होणारी फसवणूक कशी रोखू शकता?
बॅंका किंवा नॉन-बॅंकिंग कंपन्यांद्वारे दिली जाणारी डेबिट-क्रेडिट कार्डची सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा या कार्डाद्वारे तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. यासाठी संबंधिक कार्ड देणाऱ्या कंपनीने/बॅंकेने दिलेले पासवर्ड, सीव्हीव्ही क्रमांक किंवा कार्ड संबंधित माहिती गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. यासाठी बॅंका किंवा संबंधित संस्थांकडून याची वेळोवेळी माहिती दिली जाते. त्याचे कार्डधारकाने पालन करणे गरजेचे आहे.