क्रेडिट कार्ड एक फायनान्शिअल इन्स्ट्रुमेंट किंवा एक पर्याय आहे ज्यात तुम्हाला आगाऊ रक्कम (क्रेडिट) मंजुर असते आणि या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला व्यवहार करणे शक्य होते. कार्ड इश्यू करणारी बँक ग्राहकाचा सिबिल स्कोअर, क्रेडिट हिस्ट्री आणि उत्पन्न यानुसार क्रेडिट कार्डची मर्यादा ठरवत असते. सोप्या शब्दांत सांगायचे तर ही एक प्रकारची क्रेडिट फॅसिलिटी अर्थात बँकेकडून प्री अप्रुव्ह केलेले क्रेडिट लिमीट आहे. (Credit Card means Pre Approve Credit Limit)
जवळपास बहुतांश बँकांकडून खातेदारांना क्रेडिट कार्ड इश्यू केले जातात. यात काही हजारांची मर्यादा असते जी ग्राहक कुठेही खर्च करु शकतो. क्रेडिट कार्डचे बिल प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम विशिष्ट कालावधीत ग्राहकाला परत फेड करता येते. मात्र निर्धारित वेळेत भरली नाही तर मात्र क्रेडिट कार्डधारकाला विलंब शुल्क व्याजाच्या स्वरुपात भरावे लागते.
क्रेडिट कार्डसंदर्भातील माहिती बँकेकडे जपून ठेवलेली असते. यात क्रेडिट कार्ड नंबर, कार्डहोल्डरचे नाव, मुदत समाप्तीची नोंद, सही , सीव्हीसी असा डेटा बँकेकडे असतो. क्रेडिट कार्ड तुमच्या खात्याशी लिंक केलेले नसते. त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या क्रेडिट मर्यादेमध्ये तुम्ही बिनधास्त खरेदी करु शकता. मात्र त्याची परतफेड सुद्धा वेळेत होणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सदृढ राहण्यास मदत मिळेल.
आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी क्रेडिट कार्डची माहिती इतरांना शेअर करु नये, असा सल्ला दिला जातो. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांच्यातील मु्ख्य फरक म्हणजे जेव्हा तुम्ही डेबिट कार्डने खरेदी करता तेव्हा तुमच्या बँक खात्यातून पैसे वजा होतात. क्रेडिट कार्डने खरेदी केल्यानंतर पैसे तुमच्या क्रेडिट कार्डला मंजुर केलेल्या क्रेडिट लिमिट मधून वजा केले जातात. सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम अशा प्रकारात रक्कम ठरवून क्रेडिट कार्ड इश्यू केले जातात.
क्रेडिट कार्डच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांकडून क्रेडिट कार्डधारकांना अनेक सवलती दिल्या जातात. ज्यात वस्तूंवर काही ठराविक डिस्काउंट ऑफर केला जाते. विमान, रेल्वे, बस प्रवास, टॅक्सी प्रवासावर क्रेडिट कार्डने बुकिंग केल्यास सवलत मिळते. सणासुदीत आणि उत्सवकाळा क्रेडिट कार्डधारकांना कॅशबॅक, रिवार्ड्स ऑफर केले जातात. काही बँकांकडून क्रेडिट कार्डवर खातेदाराचा विमा देखील दिला जातो. क्रेडिट कार्ड जवळ बाळगण्याचा महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला कॅश सोबत ठेवावी लागत नाही.आपतकालीन परिस्थितीत पैशांची तातडीने गरज असल्यास अशावेळी क्रेडिट कार्ड फायदेशीर ठरु शकते.