ऑनलाईन पेमेंट सोबतच क्रेडिट कार्डचा वापर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी बँका ग्राहकांना अनेक सुविधा देत असतात. क्रेडिट कार्डचा वापर केल्याने ग्राहकांना अनेक ऑफर्सचा लाभ घेता येतो. क्रेडिट कार्डमध्ये क्रेडिट मर्यादा असते, ज्याचा वापर करून पेमेंट करणे शक्य होते. त्यानंतर क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची सोय असते. असे महत्त्वाचे असणारे क्रेडिट कार्ड हरवले तर? किंवा चोरीला गेले तर? काय करायचे, याची माहिती आपण घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळू शकता.
Table of contents [Show]
बँकेला त्वरित कळवा आणि कार्ड ब्लॉक करा (Inform Bank and Block Card)
क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेले ज्या बँकेकडून किंवा संस्थेकडून क्रेडिट कार्ड घेतले आहे त्या बँकेला ताबडतोब कळवणे गरजेचे आहे. त्यांना क्रेडिट कार्ड संबंधित माहिती देऊन क्रेडिट कार्ड ब्लॉक करा. यानंतर तुम्ही डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करु शकता.
एफआयआर करा (Register FIR)
विशिष्ट बँकेला माहिती दिल्यानंतर क्रेडिट कार्ड हरवल्यासंबंधी एफआयआर दाखल करा. एफआयआर केल्यानंतर क्रेडिट कार्डच्या गैरवापराबाबत तुम्ही जबाबदार राहणार नाहीत. तसेच, तुमच्याकडे कायदेशीर पुरावा मिळाल्यामुळे त्याचा वापर करून डुप्लिकेट क्रेडिट कार्ड मिळवता येऊ शकते.
तुमच्या क्रेडिट ब्युरोशी संपर्क साधा (Contact your Credit Bureau)
क्रेडिट कार्ड हरवल्याची माहिती क्रेडिट ब्युरोला द्यावी. असे केल्याने, जर एखाद्या व्यक्तीद्वारे कार्डचा गैरवापर झाला तर क्रेडिट स्कोअरवर त्याचा परिणाम होणार नाही. त्यानंतर तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासावा जर त्यात कोणतीही चुकीची माहिती आढळली तर क्रेडिट ब्युरोला संपर्क साधावा.
क्रेडिट स्टेटमेंटवर लक्ष ठेवा (Keep an Eye on Credit Statement)
क्रेडिट कार्ड हरवल्याची तक्रार जरी बँकेला केली असेल तरीही क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. एखादा संशयास्पद व्यवहार वाटल्यास त्वरित बँकेशी संपर्क करून तक्रार दाखल करावी.
क्रेडिट कार्ड अकाउंटचे पासवर्ड बदला (Change Passwords of Credit Card)
कार्ड हरवल्यावर ब्लॉक केले असेल तर पिन नंबर बदलण्याची गरज नाही. जर तुम्हाला कार्ड जवळपास कुठेही असण्याची शंका असेल आणि तात्पुरत्या स्वरूपात जर तुम्ही ते ब्लॉक केले असेल तर मात्र पासवर्ड बदलण्याची आवश्यकता आहे. कोणताही गैरवापर होऊ नये म्हणून इंटरनेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड अकाउंटचा पासवर्ड बदलणे हिताचे ठरेल.
अशाप्रकारे क्रेडिट कार्ड जर हरवले असता तणाव न घेता काळजीपूर्वक काही गोष्टी केल्या तर तुमचे लाखोंचे नुकसान होण्यापासून वाचू शकेल.