Gold Investment : बाजारातील वाढते सोन्याचे दर पाहता पुढील काही वर्षांमध्ये सोने खरेदी करणं ही अशक्यप्राय गोष्ट बनू शकते. मात्र, सोने हा केवळ एक धातू नसून आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून त्या धातूला भावनांची झळाळी प्राप्त झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे कितीही वाढले तरी सणावरांला, लग्नसोहळ्याला सोनं घेतलं नाही असू होऊ शकत नाही.
अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोन्याची खरेदी करुन घरातल्या धनलक्ष्मीमध्ये वाढ करण्याची सुंदर परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. पण आत्ताच्या सोन्याच्या दरानुसार सोनं खरेदी करणं सर्वांनाच शक्य होणार नाही. मात्र, यावर चांगला व्यवहार्य उपाय आज उपलब्ध आहे आणि तो म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे.
Table of contents [Show]
सोनाऱ्याकडे दरमहा पैसे जमा करणे
अलीकडे प्रत्येक सोनाऱ्याकडे गुंतवणूक घेतली जाते. या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या जवळच्या वा ओळखीच्या सोनाऱ्याकडे दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करु शकता. या एक वर्षाच्या गुंतवणूकीमधला शेवटचा हफ्ता हा सोनाऱ्याकडून भरला जातो. त्यानंतर या जमा झालेल्या रकमेचे आपण सोने खरेदी करु शकतो. दर महिन्याला किती रक्कम जमा करावी हे पुर्णत: आपल्यावर अवलंबुन असते. मात्र, या पद्धतीने गुंतवणूक करताना सोनाऱ्यांची विश्वासार्हता ही महत्त्वाची आहे. त्यामुळे सोनाऱ्यांची पार्श्वभूमी तपासूनच तुम्ही गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा.
डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक
डिजीटल गोल्ड हा सुद्धा सोन्याच्या गुंतवणूकीसाठी स्वस्त आणि सुरक्षित पर्याय आहे. या गुंतवणूकीमध्ये आपण एखाद्या कंपनीकडून सोने खरेदी करतो मात्र ते प्रत्यक्षात आपल्या हातात दिले जात नाही तर ते आपल्या इ-वॉलेटमध्ये जमा केले जाते. हे सोने आपल्याला मार्केट रेटनुसार खरेदी करावं लागत नाही. तर आपल्याला जितकं शक्य आहे तितक्या रकमेचं सोनं आपण या पद्धतीने घेऊ शकतो. कमीतकमी 1 रूपयाची गुंतवणूक सुद्धा आपल्याला डिजीटल गोल्डमध्ये करता येते.
गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF)
ज्याप्रमाणे आपण शेअर बाजारामध्ये एखाद्या कंपनीचे शेअर विकत घेतो अगदी त्यानुसारच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) या गुंतवणूकीमध्ये आपण शेअर मार्केटमधून शेअर घेत असतो. याठिकाणी सोनं हे सेक्युरिटीच्या स्वरूपात असतं. त्यामुळे आपल्या शक्य त्या किंमतीचे शेअर्स यूनीट आपण विकत घेऊ शकतो आणि जेव्हा पैशांची गरज असेल तेव्हा आपण ते शेअर्स विकू सुद्धा शकतो.
म्युच्युअल फंडचे गोल्ड प्लान (Gold Mutual Funds)
म्युच्युअल फंडमध्ये विविध प्रयोजनानुसार गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक पर्याय आहे तो म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे. म्युच्युअल फंडमधील अनेक कंपन्या या सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूकीचा पर्याय SIP च्या माध्यमातून देतात. आणि SIP म्हटलं तर कमीतकमी पैशात गुंतवणूक ही सहज करता येते. या गुंतवणूकीवर मिळणारा नफा हा बाजारभावावर अवलंबुन असतो.
या अक्षय्य तृतीयाला प्रत्यक्ष सोनं घेणं जरी तुम्हाला शक्य नसेल तरी या शुभमुहूर्तावर डिजीटल गोल्ड, इटीएफ किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुमच्या खिशाला परवडेल अशा किंमतीची गुंतवणूक सुरू करा आणि वर्षाअखेर चांगला परतावा मिळवा.