हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा असा अक्षय्य तृतीया उत्सव आज (शनिवार) साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. भारतातील विविध राज्यात वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हिंदू परंपरेनुसार या दिवशी सुवर्ण खरेदी केली जाते. घरामध्ये सुख, शांती आणि भरभराट येण्यासाठी सुवर्ण खरेदी केली जाते. मात्र, यंदा भाववाढीमुळे ग्राहकांना सोने खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे. त्यावर काही नागरिकांनी पर्याय शोधून काढला आहे. घरातील जुनं सोनं मोडून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवं सोनं करण्याकडे अनेकांचा ओढा आहे. त्यामुळे सोने खरेदीचं सुखं ही मिळेल आणि अतिरिक्त पैसेही खर्च करावे लागणार नाही.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भारतामध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमती 61,950 आहे. मागील वर्षभरापूर्वी सोन्याचे दर 54 हजारांच्या दरम्यान होते. मात्र, यंदा या किंमतीत 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याने सुवर्ण खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. मात्र, अक्षय्य तृतीयेला थोडेतरी सोने विकत घ्यावे, अशी इच्छा अनेक भारतीयांची आहे. त्यामुळे त्यांनी जुनं सोनं विकून नवीन सोने खरेदीचा मार्ग निवडलाय.
“जुने दागिने विकून नवीन डिझाइनचे दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येत आहेत. तसेच काही ग्राहकांना भाव जास्त वाढल्याने सोने विकून पैसे हवे आहेत”, असे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. 19 एप्रिलला 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 6,618.71 होता. मागील वर्षी हा दर 4,849 एवढा होता. तब्बल 36% वाढ 24 कॅरेट सोन्याच्या दरात दिसून येत आहे.
सौजन्य - गुगल
जेव्हा भांडवली बाजार अस्थिर असतो. रुपयाचे मूल्य घसरलेले असते. तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून नागरिक सोने या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करतात. अडचणीच्या काळात पैशांची गरज पडली तर सोने तारण ठेवून कर्जही मिळवता येते. तसेच सुवर्ण दागिने सण, उत्सव कार्यक्रमांत अंगभर घालण्याची हौस भारतीयांना आहे. विशेषत: महिलांचा दागिन्याकडे जास्त ओढा असतो. सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे भाववाढ जरी झाली असली तरी त्यांना सुवर्ण खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, इतर ग्राहक सोने खरेदी टाळत आहेत. त्याचे मुख्य कारण दरवाढ आहे.
सुवर्ण खरेदी करताना काही प्रमाणात जुने सोने घेऊन ग्राहक येत आहेत. जुने मोडून नवी सुवर्ण खरेदी आवाक्यात आणण्याचा प्रयत्न ग्राहक करत आहेत. जुने सोने विकताना काही गोष्टींकडे ग्राहकांनी लक्ष द्यायला हवे. कारण, तुमच्याकडील जुन्या सोन्यावर हॉलमार्क चिन्ह असेलच असे नाही. त्यामुळे या जुन्या सोन्याला योग्य भाव मिळेल का? हा प्रश्न काही ग्राहकांना पडत आहे.
100 टक्के शुद्ध असलेल्या जुन्या सोन्यावर हॉलमार्क नसेल तरीही त्याला योग्य भाव मिळतो. दुकानामध्ये जुन्या सोन्याचे दर फलक लावलेले असतात. या दराबाबत तुम्ही इतर दुकानात खात्री केल्यानंतर खरेदी करू शकता. त्यासाठी तुम्हाला दागिन्यांची पावतीही घेऊन जावी लागेल. सोन्याची शुद्धता तपासण्याच्या दोन पद्धती आहेत.
0% मजूरी ऑफर खरंच असते का?
अनेक सराफा पेढीकडून सोन्याच्या दागिन्यांवर 0% मजूरी अशी ऑफर देण्यात येते. म्हणजेच दागिने बनवण्याचा खर्च (मजूरी खर्च) शून्य असेल. फक्त दागिन्यांची किंमत द्या, अशी ऑफर देण्यात येते. मात्र, अशी ऑफर फक्त एक मार्केटिंग टेक्निक असू शकते. एकतर तुम्हाला महाग दरामध्ये सोने मिळेल किंवा इतर शुल्कामध्ये मजूरी शुल्क आकारले जाईल. मजूरी खर्चावर डिस्काउंट दिला जाऊ शकतो. मात्र, झिरो चार्ज ऑफरला बळी पडू नका.