Gold Rate : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. यावेळी 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. मात्र सोन्या-चांदीच्या दराने आपला विक्रमी उच्चांक गाठल्यामुळे अनेक ग्राहकांनी यावेळी अॅडव्हान्स बुकींग करण्याचे टाळले आहे. देशाअंतर्गत बाजारात प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव 61,150 रुपये आहे आणि चांदीचा भाव 77,600 रुपये प्रति किलोवर आहे. त्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीतील अतिरिक्त वाढ ग्राहकांच्या मागणीवर परिणाम करु शकते.
30 टक्क्यांनी कमी होणार खरेदी
तज्ञांच्या मते, गेल्या अक्षय्य तृतीयेच्या तुलनेत यावर्षी ग्राहकांची मागणी 25 ते 30 टक्कयांनी घटू शकते. तसेच अनेक गुंतवणूकदार गोल्ड बाँड्स, गोल्ड ईटिएफ, सॉवरेन गोल्ड यासारख्या सोन्यात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवतात. तसेच येत्या दिवाळीच्या सणापर्यंत सोन्याचा भाव 64,800 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर 50,986 रुपये एवढा होता. आणि यंदा 61,000 रुपयांच्या पूढे आहे. त्यामुळे सोन्यावर एका वर्षात 20 टक्के परतावा मिळतोय असे म्हटल्यास हरकत नाही. तेव्हा ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, असे गुंतवणूकदार अद्यापही सोन्यात गुंतवणूक करण्यास उत्साही आहे. मात्र जे छोटे गुंतवणूकदार आहेत, किंवा जे लोक सण आहे म्हणून सोने घेण्याची इच्छा ठेवतात, अश्या लोकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
ग्राहकांना आकर्षित करण्यास अनेक योजना
आपआपल्या दुकानाची विक्री वाढविण्याच्या उद्देशाने, अनेक सराफा दुकानदारांनी विविध योजना सुरु केल्या आहेत. तर काही ज्वेलर्सनी केवळ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काही विशेष योजना आणल्या आहेत. तर काहींनी घडणावळ शुल्क दरात कपात केली आहे.
सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याची कारणे
चलनवाढ (Inflation), जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची चिन्हे, भौगोलिक-राजकीय परिस्थिती ( Global Movement ), रिझर्व्ह बँकेकडून होणारी सोन्याची खरेदी, गुंतवणूक म्हणून केली जाणारी सोन्याची खरेदी, सोन्यावर मिळणारा व्याजदर यासारख्या अनेक कारणांमुळे नोव्हेंबर 2022 पासून सोन्यामध्ये 24 टक्के वाढ झाली आहे. आणि चांदी मध्ये 10 टक्के वाढ झाली आहे.