सोने खरेदीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोने खरेदीची भारतात मोठी बाजारपेठ आहे. कोणत्याही शुभ मुहूर्ताला किंवा सण-उत्सवामध्ये सुवर्ण खरेदीला महत्त्व आहे. फिजिकल गोल्ड म्हणजेच दुकानामधून खरेदी करुन सोनं घरी आणण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. सोने खरेदीला गुंतवणूक म्हणूनही पाहिले जाते. मात्र, डिजिटल गोल्ड (what is digital gold) हा गुंतवणुकीचा पर्याय भारतीयांसाठी तसा नवाच आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून डिजिटल गोल्ड विकत घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.
डिजिटल गोल्ड म्हणजे काय? (What is digital gold)
सर्वप्रथम सोने हा मौल्यवान धातू आहे. दुकानामध्ये जाऊन आपण सोने खरेदी करुन ते घरी आणतो. मात्र, डिजिटल गोल्ड तुम्ही सोने घरी न आणता ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता. तुम्हाला ते तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये दिसेल. ते तुम्ही विकू शकता.
डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे फायदे
जेव्हा तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करता तेव्हा कंपनी तुम्ही जेवढे सोने खरेदी केले आहे तेवढे वॉलेटमध्ये ठेवते. त्यामुळे तुमचे सोने सुरक्षित राहते. त्याला चोरीचा कुठलाही धोका नाही.
सोन्याची आभूषणे तयार करण्यासाठी जो खर्च येतो त्याला 'मेकिंग चार्ज' असे म्हणतात. जर तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी केले तर तुम्हाला मेकिंग चार्ज द्यावा लागत नाही. फक्त जीएसटी भरावा लागेल.
तुम्ही कमीत कमी म्हणजे १ रुपयाचेही डिजिटल गोल्ड खरेदी करु शकता. तुमच्याकडे खूप पैसे असण्याचीही गरज नाही.
तुम्हाला हे सोने फिजिकल फॉर्मध्ये पाहिजे असल्यास तुम्ही ते घरीसुद्धा आणू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
म्युच्युअल फंड खरेदी किंवा कोणतेही गुंतवणुकीसंबंधीच्या अॅपवरुन तुम्ही घरबसल्या डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. दुकानात जाण्याची गरज नाही. भारतामध्ये फक्त तीनच कंपन्या डिजिटल गोल्ड खरेदी-विक्री करतात. त्यांच्याकडून तुम्ही सोने डिजिटल स्वरुपात सोने खरेदी करू शकता.
डिजिटल गोल्ड खरेदीचे तोटे
डिजिटल गोल्ड खरेदीमध्ये तुम्हाला ३ टक्के जीएसटी द्यावा लागतो. तसेच जेव्हा तुम्ही सोने विक्री करता तेव्हा त्याची किंमत खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा 3 ते 6 टक्क्यांनी कमी असते. ज्या कंपनीकडून तुम्ही सोने घेता ती कंपनी विविध प्रकराचे शुल्क लावते. जसे की, स्टोरेज शुल्क, विमा शुल्क.
ठराविक काळानंतर तुम्हाला सोने खरेदी किंवा विक्री करावेच लागेल. किंवा त्याची होम डिलिव्हरी घ्यावी लागेल. त्यावेळी तुम्हाला मेकिंग चार्ज द्यावा लागेल.
डिजिटल गोल्ड खरेदी साठी MMTC, सेफ गोल्ड आणि ऑगमॉन्ट या तीन कंपन्या आहेत. मात्र, या कंपन्यांवर कोणत्याही सरकारी संस्थेचे नियंत्रण नाही. असे असले तरीही या सर्व कंपन्या नियमांच्या अधीन राहून काम करत आहेत. MMTC ही सरकारी कंपनी आहे. कोणाचेही नियंत्रण नसल्याने आणीबाणीच्या काळात काही तुमच्या गुंतवणुकीला धोका पोहचू शकतो.