Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करायचीये? मग 'हे' पर्यायही जाणून घ्या

Gold Investment

Gold Investment: जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर हे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय नक्कीच जाणून घ्या.

महिलांसाठी सोनं हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. मुळात भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला लक्ष्मीच्या स्थानी ठेवण्यात आलं आहे. म्हणूनच काही महत्त्वपूर्ण सणांमध्ये सोन्याची पूजा केली जाते. लग्न समारंभात वडील मुलीला सोन्याचे दागिने बनवून देतात, कारण अडचणीच्या वेळी सोनं हे आर्थिक रुपात कामी येतं. होय हे खरं आहे की, सोनं बनवण्यामागे आर्थिक गुतंवणूक (Financial Investment) हा सगळ्यात मोठा हेतू असतो. म्हणूनच तर आपल्या अनेक पिढ्या याच हेतूने  सोन्याचे दागिने बनवायच्या. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहे. याशिवाय काळानुरूप सोन्याच्या गुंतवणूकीत कोणते वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहे, हे देखील जाणून घ्या.

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे वेगवेगळे पर्याय खालीलप्रमाणे-

जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर सॉव्हरन गोल्ड बाँड (SGB), गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF), म्युच्युअल फंड, सोन्याची नाणी किंवा बिस्किट खरेदी असे पर्याय उपलब्ध आहेत.

investment-in-gold-different-options-1.jpg

सॉव्हरन गोल्ड बाँड (SGB)

sovereign-gold-bond-2.jpg
www.chittorgarh.com

तुम्हाला जर सोन्यामध्येच गुंतवणूक करायची असेल, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सॉव्हरन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) आणला आहे. हा एक प्रकारचा चांगला गुंतवणूक पर्याय आहे. हा बाँड खरेदी करून तुम्ही चांगला व्याजदर मिळवू शकता. या अंतर्गत तुम्हाला अंगठी, सोन्याचं बिस्कीट असं प्रत्यक्ष स्वरूपातील सोनं मिळत नाही, तर तुम्ही बाँड स्वरुपात सोनं खरेदी करू शकता.

याअंतर्गत गुंतवलेल्या पैशाची हमी सरकार घेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) सॉव्हरन गोल्ड बाँड जारी करण्यात येतात. या बाँडची एक ठरलेली किंमत असते. सध्या त्याची किंमत 4,912 प्रति ग्रॅम असून तो आठ वर्षांत मॅच्यूअर होतो. म्हणजेच आठ वर्षांनंतर सोन्याचा जो चालू दर असतो, त्यानुसार बाँड परत केल्यानंतर तेवढी रक्कम ग्राहकाला परत मिळते. याशिवाय त्या रकमेवर आयकर ही भरावा लागत नाही. 
उदा. एखाद्या व्यक्तीने एक लाखांचे बाँड खरेदी केले आणि परत करताना त्याला दीड लाख रुपये मिळणार असतील, तर वरील 50 हजारांवर कोणताच टॅक्स लागू होणार नाही.

सॉव्हरन गोल्ड बाँड प्रत्येक महिन्याला जारी केले जातात. त्यांची वेगवेगळी किंमत असते. मुंबईतील इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (Indian Bullion and Jewelers Association) तर्फे त्याचा दर निश्चित करण्यात येतो. महत्वाचं म्हणजे गरज पडल्यास तुम्ही हे बाँड आठ वर्षांपूर्वीही विकू शकता. घरामध्ये किंवा लॉकरला सोनं जपून ठेवण्यापेक्षा सॉव्हरन गोल्ड बाँड खरेदी करून केलेली गुंतवणूक कधीही उत्तम.

सरकारमार्फत जारी करण्यात येणारे हे बाँड्स तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता. RBI ची वेबसाईट आणि बँकांच्या ऑनलाईन अॅप्लिकेशन मार्फत तुम्ही हे बाँड्स विकत घेऊ शकता. ऑनलाईन खरेदीत 50 रुपयांची सूट देण्यात येते. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने बाँड्स विकत घायचे असतील, तर बँक, HSCIL ऑफिस, पोस्ट ऑफिस आणि एजंट्सशी संपर्क साधावा लागतो.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF)

gold-exchange-traded-funds.jpg

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमधील (ETF) गुंतवणूक ही शेअर बाजाराशी मिळती जुळती आहे. यामध्ये तुम्ही शेअर खरेदी करू शकता. त्यासाठी डिमॅट अकाऊंट उघडणं गरजेचं आहे. याअंतर्गत ETF ची खरेदी करता येते. याची विक्री दररोज होत असते.

काही कंपन्याकडून गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold Exchange Traded Funds) जारी करण्यात येतात. ते तुम्ही विकत घेऊ शकता. ज्याची सिक्युरिटी म्हणजेच सोनं असतं. जेव्हा तुम्हाला गरज पडेल किंवा ETF चे भाव वाढतील अशा वेळी तुम्ही ते विकू शकता. फक्त यामध्ये एक गोम आहे, ती म्हणजे ज्यादिवशी तुम्हाला ETF विकायचे आहेत, त्याच वेळी ते विकले जातील की नाही हे सांगता येत नाही. थोडक्यात जर तुम्हाला सोनं विकायचं आहे, पण खरेदी करणारे  कुणीच नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते.

परंतु शेअर बाजारात अशा प्रकारची समस्या सतत येत नाही. बऱ्याच कंपन्या अशा प्रकारची खरेदी विक्री सतत करत असतात. भारतात हा प्रकार जास्त लोकप्रिय नाही. मात्र अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा प्रकार अतिशय प्रचलित आहे. भारतात आजही लोकांसाठी सोनं हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

म्युच्युअल फंड

mutual-funds-2.jpg

हल्ली अनेक जण म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Funds) गुंतवणूक करतात. पण तुम्हाला माहित आहे का, म्युच्यूअल फंडच्या माध्यमातून देखील गोल्ड फंडमध्ये (Gold Funds) पैसे गुंतवता येतात. अगदी 500 रुपयांपासून ही गुंतवणूक सुरु करता येते. सर्वसामान्य व्यक्तीला कमी पैशात गुंतवणूक करायची असेल, तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

म्युच्यूअल फंड अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या बऱ्याच कंपन्या गोल्ड फंडाच्या क्षेत्रात ही कार्यरत आहेत. या कंपन्या तुमचा पैसा योग्य त्या गोल्ड फंडामध्ये गुंतवतात. बाजारातील चढ-उतारानुसार तुम्हाला त्याचा परतावा मिळतो. मात्र या प्रकारामध्ये ETF सारखी समस्या कधीच उध्दभवत नाही.

समजा, तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले, आणि दोन वर्षांनी तुम्हाला त्या पैशांची गरज पडली, तर कंपनीला ते पैसे परत करावेच लागतात. अशा वेळी खरेदीदार कोणतेही कारण देऊ शकत नाही. त्यासाठी कंपनीला शुल्क स्वरूपात एक ते दोन टक्के रक्कम द्यावी लागू शकते.

सोन्याची नाणी किंवा बिस्किट खरेदीला प्राधान्य

buying-gold-coins-or-biscuits.jpg

आजही बहुसंख्य लोक प्रत्यक्ष दागिने खरेदीला प्राधान्य देतात. थेट सराफाकडे जाऊन दागिने डोळ्यांनी न्याहाळून, त्याला स्पर्श करून खरेदी करण्यात आजही अनेकांना आनंद मिळतो. पण हल्ली सोन्याचे कोणतेही दागिने खरेदी करण्याऐवजी सोन्याची नाणी किंवा बिस्किट यांची खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

यामागे काही कारणं आहेत, दागिन्यांच्या आणि नाणी किंवा बिस्किट यांच्या खरेदीमध्ये मजुरी (Making Charge) खर्च पकडला जातो. दागिन्यांवर होणाऱ्या मजुरीचा खर्च हा 20 ते 22 टक्क्यांपर्यंत असतो. म्हणजेच एक लाखांचं सोनं खरेदी केल्यानंतर साधारण तुम्हाला 20 हजार रुपये जास्त द्यावे लागतात. पण नाणी किंवा बिस्किटांच्या खरेदी वरील मजुरीचा खर्च हा केवळ 2 ते 4 टक्के इतका असतो.

महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष सोनं विकताना हा मजुरी खर्च गृहीत धरला जात नाही. त्यामुळे ग्राहकांचं नुकसान होतं. याशिवाय, सोन्याच्या सुरक्षेबाबतही काळजी घ्यावी लागते. याउलट गोल्ड बाँड किंवा इतर पद्धतींमध्ये गुंतवणूक केल्यास याची चिंता राहत नाही. पण तुम्हाला जर सोन्याचे दागिने घालून मिरवायचे असेल, तर प्रत्यक्ष दागिने खरेदी करणं केव्हाही उत्तम. या दागिन्यांमुळे गुंतवणूक आणि वापर अशा दोन्ही गोष्टी साध्य होतात.

सोन्यात गुंतवणूक करण्याचे फायदे कोणते?

  • सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित आणि खात्रीदायक (Safe and secure) असते. ग्राहकाला ही खात्री कायम असते की, आज केलेली सोन्यामधील गुंतवणूक भविष्यात फायद्याची ठरेल. साहजिकच त्याचे दरही वाढतील.
  • यात गुंतवणूक करण्यासाठी कुठल्याही एक्सपर्टीजची आवश्यकता लागत नाही. किंवा कोणतीही गोष्ट शिकावी लागत नाही. कोणीही यामध्ये सहज गुंतवणूक करू शकतं.
  • सोन्याच्या गुंतवणुकीत हल्ली अनेक पर्याय ऑफर केले जातात. ग्राहक त्याच्या गरजेनुसार त्याला योग्य वाटणारा पर्याय स्वीकारू शकतो.
  • गेल्या काही वर्षांत सोन्याचे मूल्य स्थिर राहिले आहे. एकवेळ चलनाचे मूल्य कमी होऊ शकते, पण सोन्याचे मूल्य हे स्थिर राहते किंवा आहे त्या किमतीपेक्षा वाढू शकते.
  • कोणत्याही गुंतवणूकदारासाठी त्याच्या मालमत्तेची खरेदी किंवा विक्री सुलभतेने होणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये हा फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. तुम्हाला पाहिजे तेव्हा सोनं रोख रकमेत रूपांतरित करता येतं. एखाद्या वेळी अडचण आल्यास, सोनं गहाण ठेवून किंवा मोडून पैसे मिळवता येतात.