सोन्याचे दागदागिने जसे शरिरावर बाहेरुन साज चढवतात तसेच सोने हा धातू शरिरासाठी तितकाच महत्वाचा आहे. लिव्हर, किडनीपासून बुध्यांक वाढवण्यासाठी सोन्याचा अंश पोटात जाणे आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये सोन्याला विशेष महत्व आहे. भारतात लहान बाळांना सुवर्ण प्राशन डोस देण्याची परंपरा आहे.सोन्याची राख आणि इतर वनस्पती मिळून तयार केलेले आयुर्वेदिक औषध लहान बाळांना दिले जाते.सुवर्ण प्राशन डोस या परंपरेने अलिकडच्या काळात एक मोठी बाजारपेठ तयार केली आहे.
सुवर्ण प्राशन ही एक अतिप्राचिन आयुर्वेद चिकित्सा पद्धती आहे. हा डोस लहान बाळापासून 12 वर्षांपर्यंतच्या मुलाला देतात. बाळामध्ये आणि लहान मुलांमध्ये प्रतिकार क्षमता वाढवणे, बुद्धी, स्मृती, एकाग्रता, वर्ण, पचन आणि आयुष्य वर्धनासाठी सुवर्ण भस्म आणि इतर वनस्पतींपासून तयार केलेले औषध तोंडाद्वारे दिले जाते. सर्वसाधारणपणे जन्मजात बाळापासून 16 वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना सुवर्ण प्राशन डोस दिला जातो.
सुवर्ण प्राशन डोससाठी वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे दर आहेत. एकीकडे सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर गेला असल्याने सुवर्ण प्राशन डोसचा खर्च देखील वाढला आहे. याबाबत आयुष्यमान भव आयुर्वेद क्लिनिकचे वैद्य डॉ. योगेश चव्हाण यांना महामनीशी बोलताना सांगितले की सर्वसाधारणपणे 1600 ते 1700 रुपयांमध्ये 100 मिलीग्रॅम सोने खरेदी होते. एक चिमुटभर सुवर्ण भस्माचे 20 डोस होतात. हे डोस 4 ते 5 मिलीग्रॅम इतके असतात. सोन्याच्या किंमतीचा चढ उतार पाहता दिड दोन वर्षांनी सुवर्ण प्राशन डोससाठी किती किंमत असावी याचा आढावा घेतला जातो असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
सुवर्ण भस्माचे शरिराला होणारे फायदे याबाबत अलिकडच्या काळात अनेक वैद्यकिय चाचण्या यशस्वी झाल्या असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. सुवर्ण प्राशन डोस देण्याच्या तीन पद्धती आहेत. अनुदिन पद्धतील सलग 180 दिवस सुवर्ण प्राशन डोस दिला जातो. दुसऱ्या पद्धतील पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्ण प्राशन डोस देण्याची प्रथा आहे. याशिवाय दर गुरुवारी सुवर्ण प्राशन देण्याची देखील पद्धत असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. सुवर्ण प्राशनाचे चांगले रिझल्ट दिसून आल्याने याबाबत समाजात जागरुकता वाढली आहे. अनेक ठिकाणी सुवर्ण प्राशनबाबत शिबीराचे आयोजन केले जाते. दरवर्षी लाखो मुलांना सुवर्ण प्राशन डोस दिला जातो.
सुवर्ण प्राशन डोसचा दर 200 रुपयांपासून 600 रुपयांच्या दरम्यान आहे. वेगवेगळ्या पद्धती आणि धातू म्हणून सोन्याचा शरिरासाठी होणारा फायदा लक्षात घेता सुवर्ण प्राशन डोसची एक मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. हिंदूमधील मराठी, जैन, गुजराती, मारवाडी यांच्यासह आता मुस्लीम समाजात देखील लहान मुलांना सुवर्ण प्राशन डोस दिला जात आहे.
सुवर्ण प्राशन डोसचे फायदे
- लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते
- मुले वारंवार आजारी पडत नाहीत.
- बालकांची वर्ण, उंची, पचन आणि आयुष्य सुधारते.
- बालकांचा आयक्यू वाढण्यास मदत होते.
- गतिमंद मुलांमध्ये सुधारणा करण्यासाठी वापर केला जातो.
- मुलांमध्ये लिव्हर आणि किडनीचे कार्य सुधारते असा दावा वैद्यांकडून केला जातो.
सुवर्ण प्राशन डोस घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
- सोने खरेदी करताना हॉलमार्क आहे का नाही बघतो तितकीच काळजी बाळाला सुवर्ण प्राशन डोस देताना पालकांनी घेतली पाहिजे.
- सुवर्ण प्राशन डोस हा अधिकृत वैद्यांकडून घेणे आवश्यक आहे.
- सुवर्ण भस्म पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून हे उत्पादन वैद्यांना पुरवले जाते. या उत्पादनाचे प्रमाणीकरण केलेले असते.
- ग्राहकांना वैद्याकडे त्याची खात्री करता येईल.
सोन्याच्या किंमतींचा होतो परिणाम
कोरोना संकटानंतर जगभरात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर गेला होता. त्याचा परिणाम आयुर्वेदातील उत्पादनांच्या किंमतींवर देखील झाला.आयुर्वेदात सुवर्ण प्राशन, सुवर्ण कल्प भस्म यात सोने धातूचा वापर होते. सोन्याच्या किंमतींनुसार आयुर्वेदातील उत्पादनांच्या किंमतींचा दर दोन वर्षांनी आढावा घेतला जातो. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमसाठी 61000 रुपयांच्या आसपास आहे.