Go First Airlines: एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका केल्यामुळे DGCA ने एअर इंडियावर कारवाई केल्याची बातमी ताजी असतानाच आता 'DGCA' ने गो फर्स्ट(Go First Airlines) कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गो फर्स्ट(Go First Airlines) च्या दिल्ली फ्लाइटने 55 प्रवाशांना न घेताच दिल्लीकडे उड्डाण केले होते. या प्रवाशांना विमानतळावर सोडून गेल्या प्रकरणी 'DGCA' ने गो फर्स्ट(Go First Airlines) कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे चला जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय?
9 जानेवारी २०२३ रोजी गो एअरचे G8-116 विमान बंगळूर ते दिल्ली रवाना झाले. यावेळी बेंगळुरू विमानतळावर 55 प्रवाशांना न घेता गो फर्स्ट(Go First Airlines) एअरलाईन दिल्लीकडे कूच केली. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रवाशांनी चेक इन(Check In) आणि बोर्डिंग पास(Boarding Pass) घेतले होते. विशेष म्हणजे विमानाचे उड्डाण होतेवेळी, ऑन बोर्डसाठी प्रवासी बसमध्येच बसले होते. मात्र, तितक्यात कंपनीने प्रवाशांना बसमध्ये सोडूनच उड्डाण केले.
या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी ट्विटरवर गो फर्स्ट(Go First Airlines) एअरलाईन कंपनीला जाबही विचारला होता. तर काहींनी पंतप्रधान कार्यालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया(jyotiraditya scindia) यांना टॅगही या ट्विटर पोस्टमध्ये केले होते. त्यानंतर 'DGCA' कडून गो फर्स्ट(Go First Airlines) एअरलाईन कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच गो फर्स्टच्या अकाउंटेबल मॅनेजरला कारणे दाखवा नोटीस बजावली व कंपनीला या प्रकरणात 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
'DGCA' च्या कारवाईनंतर काय?
गो फर्स्ट(Go First Airlines) एअरलाईनने या प्रकरणाबद्दल प्रवाशांची माफी मागून 53 प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला सोडले. तर उर्वरित 2 प्रवाशांनी पैसे परत मागितले होते. यापूर्वी जानेवारी महिन्यातच 30 प्रवाशांना सोडून एका विमान कंपनीने उड्डाण केले होते. अमृतसर ते सिंगापूर प्रवासातील या विमानाने 5 तास अगोदरच उड्डाण झाले होते.