होलसिम लिमिटेड (Holcim Limited) कंपनीचा भारतातील सिमेंट व्यवसाय मिळविण्यासाठी 10.5 अब्ज अमेरिकी डॉलरचा करार पूर्ण केल्याचे अदानी समूहाने रविवारी जाहीर केले. देशातील आघाडीच्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या अदानी समूहाने स्वित्झर्लंडमधील होलसिम समूहाकडून त्यांचा भारतातील सिमेंट व्यवसाय विकत घेतला. या व्यवहारासाठी अदानी समूहाने तब्बल 81 हजार कोटी रुपये मोजले. अदानी समूहाच्या होलसिम लिमिटेड कंपनीशी झालेल्या करारामुळे अदानी समूहाला अंबुजा सिमेंट्समधील (Ambuja Cement) 63.1 टक्के हिस्सा तर एसीसीमध्ये (ACC Cement) 54 .53 टक्के हिस्सा मिळणार आह़े. या करारामुळे अदानी समूह ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट कंपनी असणार आहे.
अदानी समूहाचे सिमेंट उद्योगातील मनसुबे जुने
अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत बंदरे, वीज केंद्रे आणि खाणकाम या मुख्य उद्योगांपलीकडे जात विमानतळं तसेच डेटा सेंटर्सपर्यंतच्या विविध क्षेत्रांत मजल मारली आहे. या समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंटेशन लिमिटेड आणि अदानी सिमेंट लिमिटेड अशा दोन सिमेंट उपकंपन्या स्थापन केल्या होत्या. यापैकी अदानी सिमेंटेशन ही कंपनी महाराष्ट्रातील रायगड आणि गुजरातमधील दहेज येथे दोन सिमेंट कारखाने उभारण्याची योजना आखत होती.
होलसिम कंपनी
होलसिम ही जगातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचा पसारा जगभरात पसरला आहे. होलसिम कंपनीने 17 वर्षांपूर्वी भारतात व्यवसाय सुरू केला होता. मात्र, अलीकडच्या काळात होलसिम कंपनीने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेत, कंपनीने भारतातील आपला गाशा गुंडाळण्याचे ठरवले होते. त्यानुसार होलसिमने भारताततील सिमेंट उद्योग विकण्याची तयारी सुरू केली होती. होलसिमचा भारतातील सिमेंट व्यवसाय खरेदी करण्यासाठी सज्जन जिंदाल यांची जेएसडब्ल्यू (JSW) आणि कुमारमंगलम बिर्ला यांचा बिर्ला समूहदेखील उत्सुक होता. मात्र, अदानी समूहाने 81 हजार कोटी रुपये मोजून होलसिमचा व्यवसाय आपल्या ताब्यात घेतला.
उत्पादन आणि पुरवठा साखळी पायाभूत सुविधा
अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cement) आणि एसीसी (ACC) यांची सध्या 70 मिलियन टन पर अॅनम (Million Tonnes Per Annum - MTPA)ची एकत्रित स्थापित उत्पादन क्षमता आहे. दोन्ही कंपन्या उत्कृष्ट उत्पादन आणि पुरवठा साखळी पायाभूत सुविधांसह भारतातील सर्वात मजबूत ब्रँड आहेत. त्यांच्याकडे 23 सिमेंट प्लांट, 14 ग्राईंडिंग स्टेशन, 80 रेडी-मिक्स कॉंक्रीट प्लांट आणि 50 हजारांहून अधिक चॅनल पार्टनर आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            