Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गौतम अदानींचा प्राईम टाईम शो! एनडीटीव्हीसाठी 'दे धक्का' ऑफर

Gautam Adani

अदानी समूहाने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीतील मालकी हिस्सा खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर दिली आहे. मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच भारतीय माध्यमांमध्ये आपला स्थान बळकट केले आहे. त्यापाठोपाठ गौतम अदानींचा मिडिया इंडस्ट्रीतला वाढता मालकी प्रभाव चर्चेचा विषय बनला आहे.

आशियातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांवर असलेले सर्वाधिक श्रीमंत उद्योजक माध्यम क्षेत्रात आक्रमकपणे विस्तार करत आहेत. मुकेश अंबानी यांनी नेटवर्क 18 मध्ये गुंतवणूक केल्यानंतर गौतम अदानी यांनीही गेल्या वर्षी क्विंटीलियन बिझनेस मिडिया प्रा.लि ही कंपनी खरेदी केली होती. मे 2022 मध्ये ब्लूमबर्ग क्विंट या डिजिटल न्यूजपोर्टलमधील 49% हिस्सा खरेदी केला होता. तीन महिन्यांत अदानी यांनी मिडिया इंडस्ट्रीत आणखी एक मोठी डील केली.नॅशनल न्यूज चॅनलमध्ये आघाडीवर असलेल्या एनडीटीव्ही या बड्या मिडिया कंपनीतला निर्णायक हिस्सा अदानी यांच्या कंपनीने खरेदी केला.त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.    

आशियातील श्रीमंत उद्योजकांमध्ये आघाडीवर असणाऱ्या गौतम अदानी यांनी माध्यम क्षेत्रातील विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. (Gautam Adani Expand his footprints in Media Industry) त्याचाच एक भाग म्हणून एनडीटीव्ही या कंपनीवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. अदानी समूहाने थेट विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेडवर ताबा मिळवला आहे. विश्वप्रधान कमर्शिअलचा एनडीटीव्हीमध्ये 29.18% हिस्सा आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आता तो अदानी समूहाच्या मालकीचा झाला आहे. त्याशिवाय अदानी समूहाने एनडीटीव्हीतील 26% हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफर दिली आहे. यावर आक्षेप घेत एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी सेबीकडे धाव घेतली आहे.कोणतीही चर्चा न करता हा एकतर्फी व्यवहार करण्यात आल्याचा आरोप रॉय यांनी केला आहे. रॉय यांनी सेबीला तक्रार केली आहे. रॉय दाम्पत्याची एनडीटीव्हीमध्ये 32.26% हिस्सेदारी आहे.

अदानी समूहाने एनडीटीव्हीतला आणखी 26% हिस्सा खरेदी करण्यासाठी प्रती शेअर 294 रुपयांची ओपन ऑफर जाहीर केली आहे. मात्र शेअर मार्केटमधील एनडीटीव्हीच्या शेअर प्राईसपेक्षा ऑफर प्राईस कमी आहे. दरम्यान, आज 24 ऑगस्ट 2022 रोजी एनडीटीव्हीच्या शेअरला अप्पर सर्किट लागले होते. एनडीटीव्हीचा शेअर 5% वधारला होता. दिवसअखेर तो 2.6% वृद्धीसह 366.20 रुपयांवर बंद झाला.

अदानी यांना माध्यमांच्या मुख्य प्रवाहात आपले स्थान बळकट करायचे. एनडीटीव्हीवर ताबा मिळवल्यास त्यांना हे साध्य करता येणार आहे. त्यादृष्टीने गेल्या वर्षापासून अदानी समूह माध्यमांमध्ये संधी शोधत आहे. गेल्या वर्षी अदानी मिडिया वेंचर्स लिमिटेड (AMVL) क्विंटीलियन बिझनेस मिडिया प्रा. लिमिटेडवर ताबा मिळवला होता. मे 2022 मध्ये ब्लूमबर्गक्विंट या डिजिटल न्यूजपोर्टलमधील 49% हिस्सा खरेदी केला होता.

मिडिया इंडस्ट्रीतली अदानी समूहाची स्ट्रॅटेजी

  • एएमजी मिडिया नेटवर्क्स लिमिटेड (AMNL) ही 100 टक्के मालकी असलेली अदानी एंटरप्राईसेस लिमिटेड (AEL) उपकंपनी आहे. 
  • अदानी समूहाच्या माहितीनुसार एएमजी मिडिया नेटवर्क्स लिमिटेड ही नुकताच नोंदणी केलेली कंपनी असून नेक्स्ट जनरेशन मिडिया प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे.
  • मुख्यत्वे डिजिटल आणि ब्रॉडकास्टमध्ये कंपनी इतरांशी स्पर्धा करेल. 
  • संजय पुगलिया यांची एएमजी मिडिया नेटवर्क्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • एएमजी मिडिया नेटवर्क्स लिमिटेडने विश्वप्रधान कमर्शिअल प्रा. लि. या कंपनीची 100% हिस्सा खरेदी 113.75 कोटी रुपयांना केली होती.
  • एनडीटीव्हीमधील 99.5% हिस्सा खरेदीसाठी विश्वप्रधान कमर्शिअल प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून ओपन ऑफर देण्यात आली आहे.
  • विश्वप्रधान कमर्शिअलमध्ये संजय पुगलिया, सेंथिल चेंगरवरयान आणि सुदिप्ता भट्टाचार्य यांची नुकताच संचालक म्हणून निवड करण्यात आली होती.
  • अदानी एंटरप्राईजने अदानी पोर्ट्स अॅंड सेझ, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मर यां कंपन्या उभ्या राहण्यास मोठं योगदान दिले. 

विश्वप्रधान कमर्शिअलच्या माध्यमातून होणार डील 

विश्वप्रधान कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेडने (VCPL) 2009 आणि 2010 मध्ये एनडीटीव्हीचे मुख्य प्रवर्तक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांची कंपनी असलेल्या आरआरपीआर होल्डिंग्ज प्रा. लि. (RRPR Holdings Ltd) या कंपनीला बिनव्याजी 403.85 कोटींचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदली VCPL ला आरआरपीआर होल्डिंग्जमधील 99.9% हिस्सा देण्यात आला. याच  आरआरपीआर होल्डिंग्जची एनडीटीव्हीमध्ये 29.18% हिस्सा आहे. त्यामुळे अदानी यांनी थेट विश्वप्रधान कमर्शिअलवर ताबा मिळवत 'एनडीटीव्ही'मध्ये शिरकाव केला आहे. एनडीटीव्हीमध्ये अप्रत्यक्ष हिस्सेदारी मिळवल्यानंतर अदानी समूहाने आता याच कंपनीच्या माध्यमातून ओपन ऑफर देऊ केली आहे. विशेष म्हणजे प्रणव रॉय यांच्या आरआरपीआर होल्डिंग्जला कर्ज देण्यासाठी विश्वप्रधान कमर्शिअलने त्यावेळी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स स्ट्रॅटेजिक वेंचर्स या कंपनीकडून निधा उभारला होता.

छुप्या पद्धतीने कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न (hostile takeover Strategy)

अदानी समूहाने एनडीटीव्हीसाठी दिलेली ओपन ऑफर म्हणजे छुप्या पद्धतीने किंवा संचालकांच्या मर्जीशिवाय कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न (hostile takeover)  केला जात असल्याची चर्चा कॉर्पोरेटमध्ये रंगली आहे. अदानी समूहाने विश्वप्रधान कमर्शिअल प्रा. लि. या कंपनीवर ताबा मिळवला आहे. विश्वप्रधान कमर्शिअलची एनडीटीव्हीमध्ये  29.18% हिस्सा आहे. त्यामुळे  कोणतीही नोटीस किंवा चर्चा न करता हिस्सा खरेदीचा प्रयत्न केल्याचा आरोप एनडीटीव्हीकडून करण्यात आला आहे. यापूर्वी देशात अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने कंपन्या ताब्यात घेण्याच्या घटना घडल्या होत्या.त्यापैकी केवळ दोनच वेळा असे प्रयत्न यशस्वी झाले. ज्यात मालकी हक्क बदलले. इतक प्रकरणे सेबी, SAT, न्यायालयाच्या लढाईत अडकली.

मुकेश अंबानी यापूर्वीच माध्यम क्षेत्रात सक्रिय (Mukesh Ambani) 

रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच मिडिया क्षेत्रात प्रवेश केला आहे. अंबानी यांची नेटवर्क 18 या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक आहे. नेटवर्क 18मध्ये सीएनएन न्यूज 18, सीएनबीसी-टीव्ही 18 या चॅनल्सचा समावेश आहे. त्यामुळे अंबानी यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी अदानी यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांवर वर्चस्व मिळवण्याची रणनिती तयार केली आहे. नुकताच पार पडलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात अंबानी आणि अदानी यांच्यात चुरस दिसून आली होती. अदानी यांची स्पेक्ट्रम लिलावात पहिल्यांदाच दावेदारी सादर केली आणि लिलाव जिंकून सर्वांचे लक्ष वेधले होते. 

Image Source : Wikipedia