अंबानी आणि अदानी या दोन प्रमुख उद्योगांमध्ये विविध क्षेत्रात जोरदार स्पर्धा सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या स्पेक्ट्रम लिलावात अदानी समूहाने आपली दावेदारी दाखवून दिली होती. आशियातील श्रीमंत उद्योजक अशी ओळख अल्पावधीत तयार केलेल्या गौतम अदानी यांनी आता अदानी कॅपिटल या बिगर बँकिंग वित्त कंपनीला (NBFC)शेअर मार्केटमध्ये उतरवण्याची तयारी केली आहे. अदानी कॅपिटलचा आयपीओ (Adani Capital IPO) आणताना गौतम अदानी 1,500 कोटींचे भांडवल उभारणार आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला अदानी विल्मर या कंपनीनं शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला होता. आतापर्यंत अदानी विल्मर या शेअरने गुंतववणूकदारांना जोरदार रिटर्न दिला आहे. त्यामुळे अदानी समूहातील नव्या आयपीओ बाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अदानी कॅपिटलच्या आयपीओची बातमी पसरल्यानंतर Adani Capital IPO कधी येणार, किती कोटींची शेअर विक्री होणार? असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अदानी कॅपिटलचा पब्लिक इश्यू वर्ष 2024 च्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. हा इश्यू 1,500 कोटी रुपयांचा असेल. आयपीओमधून अदानी कॅपिटल 10% शेअरची विक्री करेल, असे कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी गौरव गुप्ता यांनी म्हटलं आहे.
कर्ज बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करणार
अदानी कॅपिटलचा मुख्य व्यवसाय हा कर्जाचा आहे. लघु आणि मध्यम उद्योजक, शेतकरी यांची कर्जाची गरज भागवणे हा कंपनी व्यावसायिक हेतू आहे. नव्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने कंपनीला 3 लाख ते 30 लाख या रकमेच्या कर्ज बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. सध्या कंपनीकडील एकूण ग्राहकांपैकी 90 टक्के ग्राहक थेट कोणत्याही मध्यस्थ कंपनीशिवाय जोडले गेले आहेत. याच मॉडेलबाबत गुप्ता आशावादी आहेत. 2017 मध्ये अदानी कॅपिटलची सुरुवात झाली होती. देशभरात कंपनीच्या 154 ब्रांचेस आहेत. 63000 कर्जदार असून एनपीएचे प्रमाण अवघे 1% आहे.
अदानी समूहातील ‘या’ शेअर्सनी केलीय कमाल
| अदानी एंटरप्राईसेस | 2,639.40 | 
| अदानी ग्रीन एनर्जी | 2,237.25 | 
| अदानी पोर्ट अॅंड सेझ | 798.65 | 
| अदानी पॉवर | 324.10 | 
| अदानी टोटल गॅस | 3,171.60 | 
| अदानी ट्रान्समिशन | 3,205.00 | 
| अदानी विल्मर | 689.90 | 
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            