FTX क्रिप्टो एक्सचेंज दिवाळखोरीत जाण्यास कारणीभूत ठरलेला किंग ऑफ क्रिप्टोने घडल्या प्रकाराबाबत अखेर गुंतवणूकदारांची माफी मागितली आहे. FTX चा माजी सीईओ सॅम बँकमन फ्रेड याने एका जाहीर कार्यक्रमात FTX घोटाळ्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आपल्या हातून चुका होत गेल्या मात्र आपला कधीच फसवणुकीचा हेतू नव्हता, असे फ्रेड याने सांगितले.
तीन आठवड्यांपूर्वी क्रिप्टो करन्सीचा अमेरिकेतील दुसरा मोठा एक्सचेंज असलेल्या FTX कडून दिवाळखोरीचा अर्ज सादर करण्यात आला होता. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अभाव आणि निधीचा गैरवापर या अनागोंदीमुळे 'FTX'मधील सर्वात मोठा गुंतवणूक असलेल्या बायनान्सने आपली गुंतवणूक काढून घेतली होती. त्यानंतर सीईओ फ्रेड याने राजीनामा देऊन पळ काढला होता.
तब्बल तीन आठवड्यानंतर फ्रेड माध्यमांसमोर आला.'डेलबुक' या परिषदेच्या निमित्ताने तो आपल्या नेहमीच्या पेहरावात बहामाजमधून ऑनलाईन सहभागी झाला होता. यावेळी त्याने 'FTX' एक्सचेंजमध्ये घडल्या प्रकारावर भाष्य केले. फ्रेडने सर्वप्रथम या प्रकरणावर माफी मागितली. तो म्हणाला की FTX बुडण्यास आपल्या अनेक चुका कारणीभूत आहेत. एक स्पष्टपणे सांगतो की मी त्यावेळी खूप चुका केल्या किंवा चुकीचे वागलो. या चुका वारंवार करण्यासाठी मी वाट्टेल ते देण्यास तयार होतो, अशी कबुली फ्रेड याने दिली. मात्र आपण कधीच कोणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला नाही, असेही फ्रेड याने स्पष्ट केले. FTX बाबत जे घडले त्याबद्दल आपण खूप दिलगीर आहोत, अशी भावना त्याने व्यक्त केली. 'FTX'मधील गुंतवणूकदार Alameda च्या भूमिकेबाबत फ्रेड याने यावेळी संशय व्यक्त केला.FTX-Alameda या दोन कंपन्यांमधील आर्थिक व्यवहारांबाबत आपल्याला माहित नाही, असे त्याने स्पष्ट केले.
'FTX' या संकटातून सावरेल
FTX एक्सचेंज दिवाळखोरीच्या संकटातून सावरेल, अशा अशावाद फ्रेड याने व्यक्त केला आहे. विशेषत: 'FTX' च्या अमेरिकेतील गुंतवणूकदारांना नुकसान भरपाई मिळेल, असेही फ्रेड याने म्हटले आहे मात्र ते कसे मिळणार याबाबत अधिक माहिती त्याने दिली नाही. FTX मधील गुंतवणूकदारांना मदत करण्याची इच्छा त्याने यावेळी व्यक्त केली.
खोट्या आरोपांवरुन फ्रेड झाला व्यथित
'FTX' कोसळ्यानंतर झालेल्या आरोपांवरुन आपल्याला प्रचंड धक्का बसल्याचे फ्रेड याने यावेळी सांगितले.11 नोव्हेंबर 2022 रोजी FTX ने दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर फ्रेड याने सीईओ पदाचा राजीनामा दिला होता.FTX कडे तब्बल 32 बिलियन डॉलर्सची मालमत्ता होती. मात्र त्यातील 10 बिलियन डॉलर्सचा फ्रेड याने गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून गैरवापर केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आपल्यावर फौजदारी खटला चालेल का नाही, हे सांगू शकत नाही. पण वकिलाने शांत राहण्याचा सल्ला धुडाकावून आपण या घोटाळ्याची सत्य परिस्थिती समोर आणू. आपण आता गप्प राहणार नाही, असेही फ्रेड याने स्पष्ट केले.