भारत आणि ऑस्ट्रेलिया (India - Australia Free Trade) दरम्यानच्या मुक्त व्यापार कराराची (Free Trade Agreement) अंमलबजावणी आजपासून (29 डिसेंबर) सुरु झाली आहे. आणि त्यामुळे 96 वस्तू आणि सेवांचा व्यापार ड्युटी फ्री पद्धतीने होऊ शकेल. या करारामुळे उभय देशांदरम्यानचा व्यापार दुप्पट म्हणजे 50 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाईल असा अंदाज आहे.
भारतासाठी या कराराचा मुख्य फायदा देशातल्या वस्त्रोद्योगाला होणार आहे. कारण, देशांतर्गत बनणारं तयार कापड आणि चामड्याच्या वस्तू यांना ऑस्ट्रेलियाची बाजारपेठ खुली होणार आहे.
भारत - ऑस्ट्रेलिया मुक्त व्यापार कराराची वैशिष्ट्यं
- एप्रिल 2022 मध्ये झालेल्या एका करारा अंतर्गत भारतातल्या उत्पादकांना तयार कपडे, चामड्याच्या वस्तू, फर्निचर, दागिने आणि यंत्राचे सुटे भाग अशा वस्तूंसाठी ऑस्ट्रेलियन बाजारपेठ खुली होईल. या वस्तूंची भारतातून निर्यात ही ड्युटी फ्री असेल.
- भारतातल्या स्टील आणि अॅल्युमिनिअम उद्योगाला लागणारा कच्चा माल ऑस्ट्रेलियातून भारताला मिळेल. याशिवाय या क्षेत्रात ऑस्ट्रेलियातून गुंतवणूकही होईल.
- भारतातल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना ऑस्ट्रेलियन प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. तसंच दोन्ही देशातल्या तंत्रज्ञांसाठी दुहेरी स्नातक अभ्यासक्रम सुरु केले जाती. म्हणजे या अभ्यासक्रमातून मिळणारी डिगरी दोन्ही देशात चालू शकेल. ऑस्ट्रेलियात दरवर्षी 40,000 भारतीयांना नोकऱ्याही मिळतील.
- कामगारांवर आधारित क्षेत्रांमध्ये वस्त्रोद्योग, कृषि, मत्स्य उत्पादन, चामड्याच्या वस्तू आणि चपला, फर्निचर तसंच स्पोर्ट्स उपकरणं या क्षेत्रात ऑस्ट्रेलियातून गुंतवणूक होईल.
- भारतातून सध्या ऑस्ट्रेलियात जी निर्यात होते त्यातली 96.4% निर्यात ही इथून पुढे ड्युटी फ्री असेल. सध्या या उत्पादनांवर ऑस्ट्रेलियाकडून 4-5% इतकं सीमाशुल्क आकारण्यात येतं. त्यामुळे भारतीय कंपन्यांना मोठी सवलत मिळणार आहे.
- भारतातून 2022 मध्ये 8.3 अब्ज अमेरिकन डॉलर इतका माल ऑस्ट्रेलियात निर्यात झाला. तर ऑस्ट्रेलियातून 16.75 अब्ज अमेरिकन डॉलर इतका माल आयात झाला. आता ऑस्ट्रेलियातून भारतात येणाऱ्या 85% वस्तू आणि सेवांवरही भारत कुठल्याही प्रकारचा कर आकारणार नाही.
- मुक्य व्यापार करारामुळे भारताची ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात 10 अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचेल असा अंदाज आहे. आणि यातून भारतात 10 लाख इतकी रोजगार निर्मितीही होऊ शकेल. शिवाय भारतीयांना ऑस्ट्रेलियात रोजगाराची संधीही मिळेल.