अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांना सोमवारी 26 डिसेंबर रोजी थोडी पोटदुखी आणि ताप जाणवत असल्यामुळे नवी दिल्लीतच AIIMS एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या आजाराबरोबरच त्यांची नियमित आरोग्य तपासणीही होणार होती. सीतारमण यांची प्रकृती सुधारल्यामुळे गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
सीतारमण यांची प्रकृती सुधारत असल्याचं अर्थमंत्रालयातल्या सूत्रांनी मीडियाला सांगितलं आहे. पण, याविषयी अधिकृतपणे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं ही बातमी देताना, ‘काही काळजी करण्यासारखं नाही. त्या बऱ्या आहेत,’ असं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं होतं.
63 वर्षीय निर्मला सीतारमण यांना पुढच्या वर्षी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायचा आहे. आणि अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी विविध क्षेत्रातले तज्ज्ञ तसंच अधिकारी लोकांशी बैठका घेण्याचा त्यांचा कार्यक्रम अलीकडे सुरू होता. तर रुग्णालयात दाखल होण्याच्या दिवशीही त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंती निमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर 24 डिसेंबरला त्यांनी चेन्नईमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभाला हजेरी लावली होती.
या दगदगीमुळेच त्यांची प्रकृती बिघडल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.