केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांना सोमवारी दुपारी (26 डिसेंबर) बारा वाजताच्या सुमारास नवी दिल्लीत AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण, त्यांची प्रकृती स्थिर असून पोटाची छोटी तक्रार आणि नियमित तपासणीसाठी (Regular Health Checkup) त्यांना दाखल करण्यात आल्याचं वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. 63 वर्षीय सीतारमण यांना खाजगी विभागात (Private Ward) दाखल करण्यात आलं आहे.
पुढच्या वर्षी 1 फेब्रुवारीला निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठी विविध समित्या आणि तज्ज्ञांबरोबर मागचे काही दिवस त्यांचं चर्चासत्र सुरू होतं . 21 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या दिवसांमध्ये दररोज त्या अशा बैठकांना ऑनलाईन उपस्थित होत्या.
अलीकडे मीडियाशी बोलताना अर्थसंकल्पाची दिशाही त्यांनी स्पष्ट केली होती . ‘गरज असेल तिथे अनुदानाच्या माध्यमातून सरकारी खर्च वाढवून, प्रत्येक क्षेत्राला उभारी देणारा आणि देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जाणारा अर्थसंकल्प सादर करू,’ असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
येणाऱ्या दिवसांमध्ये महागाई दर आटोक्यात ठेवण्याचा इरादाही त्यांनी स्पष्ट केला होता.
सीतारमण यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल, असं त्यांच्या निकटवर्तीयांनी वृत्तसंस्थांना सांगितलं. आहे. पण, त्यांचे मागचे दोन दिवस व्यस्त होते. काल 25 डिसेंबरला एका खाजगी कार्यक्रमासाठी त्या चेन्नईला गेल्या होत्या. तिथून परतल्यावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या कार्यक्रमाला त्या हजर राहिल्या.
(नोट : बातमी अपडेट होत आहे)
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            