Bank FD Vs Kisan Vikas Patra: सध्या सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही जण गुंतवणुकीसाठी सरकारी योजनांची निवड करतात, तर काही जण बँकेतील मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit-FD) पैसे गुंतवतात. पोस्टाच्या अनेक योजनांमधून चांगला परतावा मिळतो. त्यापैकी किसान विकास पत्र 10 वर्षांच्या मॅच्युरिटीसह येते आणि सरकारने अलीकडेच या योजनांवरील व्याजदरही वाढवले आहे. दुसरीकडे, एसबीआय, एचडीएफसी आणि पीएनबी सारख्या बँका मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ करत आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर पूर्वीपेक्षा आताच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बरीच वाढ करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते?
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra)
किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra-KVP) ही योजना अल्प बचत योजनेंतर्गत येते आणि तिचे व्याज त्रैमासिक आधारावर ठरवले जाते. जानेवारी ते मार्च 2023 पर्यंतचा व्याजदर वार्षिक 7.2 टक्के होता. आताही तोच व्याजदर ठेवण्यात आला आहे. तुम्ही या व्याजदरावर गुंतवणूक केल्यास तुमचे उत्पन्न 10 वर्षांत दुप्पट होईल. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. किसान विकास पत्रामध्ये अगदी आपण 1000 रुपयांपासून देखील गुंतवणूक करू शकतो. यापूर्वी 1,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये अशाच स्वरूपात गुंतवणूक करता येत होती.
पण आता आपल्याला 100 च्या पटींमध्ये कितीही रकमेची गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा (Maximum Limit) नाही. शिवाय या योजनेंतर्गत कितीही अकाऊंटस् ओपन करता येतात. तसेच पोस्ट ऑफिसासोबतच काही अधिकृत बँकांमध्ये देखील KVP साठी अकाउंट सुरु करता येते. यामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम 120 महिने म्हणजेच 10 वर्षांत दुप्पट होते. या योजनेवर कर सवलत मिळत नाही. कारण किसान विकास पत्र योजना 80C अंतर्गत येत नाही. सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएस कापला जातो. तुम्ही त्यात 1 लाख रुपये गुंतवले आणि 10 वर्षे गुंतवणूक ठेवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीनंतर म्हणजे कालावधी पूर्ण झाल्यानंतर 2 लाख रुपये मिळतील.
बँकेचे FD व्याजदर
10 वर्षांच्या मॅच्युरिटीवर, SBI FD वर सामान्य नागरिकांना 3% ते 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.60% व्याजदर दिला जात आहे. ज्याचा कालावधी 7 दिवस ते 10 वर्षे इतका आहे. HDFC बँक सर्वसामान्य नागरिकांना मुदत ठेवींवर 3 ते 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.75% व्याजदर देत आहे. याचा कालावधीदेखील 7 दिवसांपासून ते 10 वर्षांचा आहे. पंजाब नॅशनल बँकेचे FD व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 ते 7.25% आणि 4 ते 7.75% पासून सुरू होतात. हे व्याजदर 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी लागू आहेत.
गुंतवणूकदार बँकेतील मुदत ठेवी (Fixed Deposit-FD) आणि किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra-KVP) या दोन्हीमध्ये गुंतवणूक करून चांगला लाभ मिळवू शकतात. बँका सध्या मुदत ठेवींवर चांगले व्याज देत आहेत. त्याचप्रमाणे पोस्टाच्या KVP स्कीममध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.
(डिसक्लेमर : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' गुंतवणुकीबाबत सल्ला देत नाही.)
(Source: www.abplive.com)