पगारदार कर्मचाऱ्यांचा वेतनातील काही रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (EPFO) जमा होत असते. यालाच प्रोव्हिडट फंड देखील म्हणतात. याद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांचे भविष्यातील आर्थिक नियोजन करता येते. ही रक्कम खातेधारकाला हवी असेल तेव्हा आवश्यक ती कागदपत्रे सादर करून काढता येते. यासाठी युएएन (UAN) क्रमांक तुम्हांला दिला जातो. या क्रमांकाच्या आधारे पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम काढता येते. प्रत्येक पीएफ खातेधारकाला स्वतंत्र युएन नंबर दिला जातो.
आता मात्र यासाठी युएएन (UAN) क्रमांकाची गरज नाही!
बरेच वेळा कर्मचारी कंपनी बदलतात. कंपनी बदलल्यानंतर दुसऱ्या कंपनीत गेल्यावर देखील तिथे तोच युएएन नंबर वापरला जातो. परंतु अचानक कंपनी बंद पडल्यास अथवा ज्या नव्या कंपनीत कामाला लागलो आहे तिथे पीएफची सुविधा नसल्यास खात्यातील शिक्कल पैसे तपासणे, रक्कम काढणे यासाठी मेहनत घ्यावी लागते. बऱ्याचदा (UAN) क्रमांक नोंद करून न ठेवल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात.
अशावेळी काय कराल?
जर तुमच्याकडे तुमच्या पीएफ खात्याचा युएएन क्रमांक नसला तरी काळजी करण्याचे कारण नाही. EPFO कडे तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असतो. तुम्ही 011-229014016 यावर मिस्ड कॉल देऊ शकता. यानंतर तुमच्या मोबाईलवर पीएफमधील बँलेन्स किती आहे हे दर्शवणारा मेसेज येईल. तुम्हांला जेव्हा पीएफ खात्यातील रक्कम काढायची असेल तर नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हांला नॉन-कम्पोजिट फॉर्म (Non Composite Form) भरून द्यावा लागेल. त्यानंतर पोस्टाद्वारे तुमचा फॉर्म EPFO कार्यालयात जमा होईल. त्यानंतर तुमच्या KYC माहितीनुसार तुम्हांला तुमचे पैसे बँक खात्यात पाठवले जातील.
पीएफ खात्यातील रक्कम कधी काढू शकता?
निवृत्त कर्मचारी आपल्या निवृत्तीनंतर कधीही पैसे काढू शकतो. तसेच ज्या पगारदार कर्मचाऱ्याने कंपनी सोडली आहे तो कर्मचारी नोकरी सोडल्यापासून 2 महिन्यांच्या कालावधी नंतर रक्कम काढू शकतो. नोकरीत असताना काही विशिष्ट कारणांसाठी देखील तुम्हांला पीएफ काढता येऊ शकतो. यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पीएफ कार्यालयात सादर करणे आवश्यक असते.
कुठलेही कमिशन द्यायची गरज नाही!
अनेकदा बदललेल्या नव्या नियमांची कर्मचाऱ्यांना माहिती नसते. याचा गैरफायदा काही लोक घेताना आढळले आहेत. पीएफ खात्यातून पैसे काढून देण्यासाठी काही एजंट कर्मचाऱ्याकडून पैसे घेताना आढळले आहेत. आम्ही सांगू इच्छितो की, अशा एजंटापासून सावध राहा. पीएफ मधील पैसे ही तुमची एक गुंतवणूक आहे. त्यावर केवळ तुमचाच अधिकार आहे. EPFO यावर कुठलेही कमिशन घेत नाही. याबाबत नजीकच्या पीएफ कार्यालयाला अथवा पोस्ट ऑफिसला भेट द्या. तिथे तुमच्या शंकांचे निरसन नक्कीच केले जाईल.