पीएफ सभासदांसाठी एक खुशखबर आहे. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये 2021-2022 या आर्थिक वर्षासाठीचे व्याज जमा करण्याची लांबलेली प्रक्रिया अखेर सुरु झाली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ सभासदांच्या खात्यात व्याज जमा करायला सुरुवात केली आहे. 'ईपीएफओ'चे देशभरात साडेसहा कोटींहून अधिक सभासद आहेत. ईपीएफओकडे 15.7 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व लाभार्थ्यांना व्याज हस्तांतराबाबत महत्वाची अपडेट दिले आहे. व्याजाची रक्कम हस्तांतर करण्यास झालेल्या विलंबामुळे कर्मचाऱ्याना नुकसान होणार नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे. EPFO ने गेल्याच महिन्यात या प्रक्रियेबद्दल ट्विट केले होते. क्रेडिट केलेला व्याजदर लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये दिसून येईल, असे त्यात सांगण्यात आले होते. पासबुकमध्ये तुमची ईपीएफओ शिल्लक तपासणे हा एक मार्ग आहे. तुम्ही नोंदणीकृत सदस्य असल्यास किंवा तुमचा 12-अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय केला असल्यास तुमचे पासबुक तपासणे सोपे आहे.
खालील पर्यायांचा अवलंब करून तुम्ही तुमची शिल्लक तपासू शकता.
- पायरी 1: EPFO च्या अधिकृत वेबसाइट - epfindia.gov.in वर जा.
- पायरी 2: डॅशबोर्डच्या वर तुम्हाला 'सेवा' विभाग दिसेल. येथे क्लिक करा आणि या विभागातील ‘कर्मचाऱ्यांसाठी’ हा पर्याय निवडा.
- पायरी 3: तुम्हाला तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ (पेज) दिसेल. आता ‘सेवा’ विभागाच्या खाली दिलेला ‘सदस्य पासबुक’ हा पर्याय निवडा. इथून तुम्हाला लॉगिन पेजवर जाता येईल.
- पायरी 4: तुमचा UAN तपशील आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. तुम्हाला कॅप्चा कोडचे उत्तर देखील द्यावे लागेल.
- पायरी 5: यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला EPF खात्यावरवरील तपशील बघता येतील. येथे, कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या योगदानाचे तपशील सादर केले आहेत. तुम्हाला मिळालेले व्याज देखील याठिकाणी दिसेल.
मिस्ड कॉलने बॅलन्स जाणून घ्या
तुम्ही एसएमएस किंवा मिस्ड कॉल पाठवून देखील तुमची शिल्लक तपासू शकता. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 वर ‘EPFOHO UAN ENG’ असा एसएमएस पाठवा. तुम्ही 011-22901406 किंवा 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल पाठवून देखील तुमच्या शिल्लक तपशील मिळवू शकता.