तुम्ही अलीकडे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतले (Employee’s Provident Fund) पैसे परत मिळवण्यासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय का? तसं झालं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. कारण, देशभरात असे हजारो अर्ज मागच्या वर्षभरात अनेकदा फेटाळण्यात आले.
म्हणजे नोकरीच्या काळात राबून कमावलेले तुमचे हक्काचे पैसे खातेधारकाला किंवा त्यांच्या पश्चात कायदेशीर वारसाला मिळत नव्हते. त्यासाठी केलेले क्लेम वारंवार फेटाळले जात होते. नाहीतर पैसे मिळण्यासाठी खूप उशीर होत होता. आणि महत्त्वाचं म्हणजे EPFO कार्यालयातल्या अधिकाऱ्यांकडून काहीवेळा क्लेम पास करण्यासाठी लाचही मागितली जात होती. अशा तक्रारींची संख्या वाढल्यानंतर आता EPFO कार्यालयाला जाग आली आहे. आणि त्यांनी तसंच दूरसंचार व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने आता लोकांच्या तक्रारीचं नीट निराकरण व्हावं यासाठी EPFO विभागाला मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत.
EPFO मधील काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी आणि कामात कसूर केल्यामुळे EPFO कार्यालयाची प्रतिमा मलिन होत असल्याचं केंद्रसरकारने मान्य केलंय. आणि म्हणूनच तातडीने ही मार्गदर्शक तत्त्वं सर्व EPFO कार्यालयांना पाठवण्यात आली आहेत. शिवाय दूरसंचार खात्याच्या वेबसाईटवरही ठळकपणे ती देण्यात आली आहेत. त्यानंतर तरी लोकांचे भविष्यनिर्वाह निधीसाठीचे क्लेम वेळेत पास व्हावेत ही अपेक्षा आहे.
- प्रत्येक कार्यालय प्रमुखाने कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार होऊ नयेत यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक यंत्रणा उभारावी, जेणे करून अरे अपप्रकार टाळता येतील.
- निर्वाह निधीचा क्लेम पहिल्यांदा तपासणाऱ्या व्यक्तीने अर्जाची नीट छाननी करून तेव्हाच्या तेव्हा अर्जात काय कमी आहे, तो अर्ज का फेटाळला जातोय याची नीट माहिती ग्राहकांना द्यावी. प्रत्येक नवीन टप्प्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी ग्राहकांची अर्ज फेटाळले जाऊ नयेत याची जबाबदारी शाखा प्रमुखांवर देण्यात आली आहे.
- एखाद्या व्यक्तीचा अर्ज वारंवार फेटाळला जात असेल तर त्याची जबाबदारी प्रादेशिक भविष्यनिर्वाह आयुक्तांना देण्यात आली आहे. त्यांनी दर महिन्याला फेटाळल्या जाणाऱ्या अर्जांचा फेरआढावा घ्यावा असं त्यांना सांगण्यात आलं आहे.
- तर EPFO कार्यालयाच्या विभाग आयुक्तांना वारंवार फेटाळल्या जाणाऱ्या अर्जांवरचा एक अहवाल दर महिन्याला तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या सगळ्यामुळे आपल्या भविष्यनिर्वाह निधीचा क्लेम वेळेवर आणि सुटसुटीतपणे पास होईल अशी अपेक्षा करूया.