Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Elon Musk To Tesla Employees : ‘शेअर बाजारातील पडझडीकडे सध्या लक्ष देऊ नका’ 

Elon Musk

Elon Musk To Tesla Employees : टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये 2022 मध्ये 70% ची घसरण झाली आहे. तिच्याकडे लक्ष न देता उत्पादन आणि बाजारपेठेत पुरवठा वाढवण्यावर लक्ष द्या असं आवाहन आता टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल लिहून केलं आहे

टेस्ला (Tesla Inc) या इलेक्ट्रिक कार उत्पादक (Electric Car Manufacturing Company) कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यासाठी 2022 वर्षाचा उत्तरार्ध चांगलाच वादळी ठरलाय. ट्विटर (Twitter Inc.) या सोशल मीडिया साईट बरोबर त्यांनी केलेला करार वादग्रस्त ठरला. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा फटका त्यांची मूळ नफ्यात असलेली कंपनी टेस्ला (Tesla Inc) कार्सलाही बसला. बाजारपेठेतली मागणी कमी होणं आणि ट्विटर वादळात मस्क यांची झालेली नाचक्की यामुळे टेस्ला कंपनीचे शेअर 2022 मध्ये तब्बल 70% नी खाली आहे.  

या सगळ्या प्रकारात मस्क यांच्यावर आरोप झाला की, ट्विटरकडे लक्ष पुरवण्याच्या नादात त्यांचं टेस्लाकडे दुर्लक्ष झालं. आता एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्लाकडे लक्ष द्यायचं ठरवलेलं दिसतंय . सुरुवात म्हणून कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी एक ईमेल लिहिलाय. आणि यात, ‘स्टॉक मार्केटच्या विक्षिप्त वागण्याकडे लक्ष देऊ नका,’ असं त्यांनी म्हटलंय.  

त्यांच्या या ईमेलची प्रत रॉयटर्स या वृत्तसंस्थेलाही मिळाली आहे. आणि त्यावरून रॉयटर्सने बातमी केली आहे. सध्या टेस्ला शेअरमध्ये पडझड होत असली तरी दीर्घ मुदतीत इलेक्ट्रिक कारना चांगली बाजारपेठ आहे, असं मस्क यांना वाटतं. त्यामुळे या सविस्तर ईमेलमध्ये ते म्हणतात, ‘टेस्लाचं कंपनी आणि उद्योग म्हणून मूल्य कमी होणार नाही. त्यामुळे शेअर बाजाराकडे लक्ष न देता तुम्ही तिमाहीत करायच्या कार उत्पादन आणि पुरवठा या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा.’ 

टेस्ला कारचा खप वाढावा यासाठी मस्क यांनी अमेरिका आणि चीनमध्ये आपल्या कारवर भरघोस सवलत देऊ केली आहे. आणि त्यातून कारची मागणी येणाऱ्या तिमाहीत वाढेल, असा कंपनीचा अंदाज आहे. वाढलेली मागणी कंपनीकडून पूर्ण व्हावी यावर आता कंपनीने लक्ष केंद्रीत केलं आहे.  

टेस्ला कंपनीने तयार केलेल्या अंतर्गत अहवालात चौथ्या तिमाहीत 4,42,452 इलेक्ट्रिक कारची मागणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आणि त्यामुळे मस्क आपल्या कर्मचाऱ्यांना लिहितात, ‘पुढचे काही महिने तहान-भूक हरवून काम करा. आणि मदतीसाठी स्वत:हून पुढे या.’ 

टेस्ला शेअरमध्ये झालेल्या पडझडीमुळे कंपनीतल्या कित्येक कर्मचाऱ्यांचं दुहेरी नुकसान झालं आहे. कंपनीची विश्वासार्हता कमी झाली. आणि अनेकांकडे कंपनीचे शेअर होते. त्याचं मूल्य कमी झाल्यामुळेही आर्थिक नुकसान झालं. अगदी कामगार वर्गालाही शेअरच्या माध्यमातून काही टक्के मोबदला देण्याची पद्धत टेस्ला कंपनीत आहे. त्यामुळे शेअरचं घटलेलं मूल्य त्यांच्यासाठी जास्त बोचणारं आहे.  

अमेरिकन शेअर बाजारात टेस्ला कंपनीचा शेअर 110 अमेरिकन डॉलरच्या भोवती घुटमळतोय. मॉर्गन स्टॅनले कंपनीने पुढच्या वर्षी शेअरची किंमत 250 अमेरिकन डॉलरपर्यंत वर चढू शकेल असं म्हटलंय. पण, याच कंपनीने आधी हे मूल्य 350 डॉलरपर्यंत जाईल असं म्हटलं होतं. पण, अलीकडच्या घडामोडींनंतर आपलं निर्धारित लक्ष्या मॉर्गन स्टॅनले कंपनीने कमी केलं.