ट्विटरसाठी (Twitter Inc) मागचा अख्खा आठवडा भरपूर गोंधळाचा गेला आहे. ब्लू ट्विटरची (Blue Twitter) सुरूवात तर झाली. पण, तेव्हापासून एलॉन मस्क (Elon Musk) आणि ट्विटर कंपनी (Twitter Inc) फक्त चुकीच्या कारणासाठी चर्चेत आहे. त्यातच रविवारी मस्क यांनी ट्विटर पोलला (Twitter Poll) सुरुवात केली. आणि कंपनीविषयीचे सर्व धोरणात्मक निर्णय इथून पुढे पोलच्या आधारे घेतले जातील , असंही त्यांनी जाहीर केलं.
आणि पहिला पोलही जाहीर केला. त्यांचा प्रश्न होता, ट्विटरच्या अध्यक्षपदावरून मी पायउतार होऊ का?
आणि गंमत म्हणजे या पोलमध्ये बारा तासांच्या निर्धारित वेळेत 1 कोटी लोकांनी भाग घेतला. आणि त्यापैकी 57% लोकांचा कौल होता - येस! म्हणजे मस्क यांनी सोडून जावं असंच या लोकांचं म्हणणं आहे.
खरंतर हा पोल जाहीर करताना मस्क यांनी आपण तुम्ही दिलेला कौल पाळू असं म्हटलं होतं. पण, प्रत्यक्ष कौल जाहीर झाल्यावर पुढचे सहा तास त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आणि मग एकच छोटं ट्विट केलं. ज्यात त्यांनी म्हटलं होतं, इथून पुढे फक्त ब्लू ट्विटरचे सदस्य असलेल्या लोकांनाच असा पोलमध्ये सहभागी होता येईल.
आताचा निर्णय ते मान्य करणार का हे अजूनही मस्क यांनी गुलदस्त्यातच ठेवलंय.
मागचा आठवडा ट्विटरसाठी गुंतागुंतीचा ठरलाय. एकतर मस्क यांनी ट्विटर वापरण्याचे नियम बदलले. ते बदलताना दुसऱ्या सोशल मीडिया साईटला टॅग करता येणार नाही, असं जाहीर केलं. त्यांना विरोध करणाऱ्या अमेरिकन पत्रकारांची ट्विटर खाती बंद केली. आणि त्यानंतर हा ऑनलाईन पोल.