अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मिळवलेला ट्विटर (Twitter) या सोशल मीडिया साईटचा ताबा अनेक अर्थांनी गाजला. आणि कंपनी ताब्यात घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ, ब्लू टिक (Blue Twitter) काढून टाकणं, त्यांच्या विरोधात लिहिणाऱ्या अमेरिकन पत्रकारांच ट्विटर अकाऊंट बंद करणं, अशा त्यांच्या प्रत्येकच निर्णयाची चर्चा झाली.
आणि एकीकडे अशा निर्णयांची चर्चा सुरूच असताना आर्थिक दृष्ट्या ट्विटरला उभारी देण्याचे मस्क यांचे प्रयत्नही सुरूच आहे. त्यासाठी ते गुंतवणूकदारांच्या शोधात आहेत. आणि मस्क यांनी ट्विटर कंपनीचा एक शेअर जितक्या डॉलरना विकत घेतला तितक्याच दराने त्यांना तो विकायचा आहे. त्यांनी ट्विटरच्या एका शेअरची किंमत ठरवलीय 54.20 अमेरिकन डॉलर प्रती शेअर. मस्क यांनी ट्विटर कंपनी एका दमात विकत घेताना 44 अब्ज अमेरिकन डॉलर मोजले. आणि त्यामुळे कंपनीवर त्यांचा एकछत्री अंमल सुरू झाला.
आता टेस्ला कार या मस्क यांच्या फ्लॅगशिप कंपनीच्या शेअरमध्ये झालेली घसरण आणि ट्विटर कंपनीसमोरची आर्थिक संकटं यामुळे ट्विटर चालवण्यासाठी मस्क यांना भागिदार हवे आहेत. त्यांचं खाजगी ऑफिस सांभाळणारे जेरेड बिरचाल यांनी संभाव्य गुंतवणूकदारांशी भेटीगाठीही सुरू केल्या आहेत.
अमेरिकेतल्या सेमाफॉर या न्यूज वेबसाईटने याविषयीची सविस्तर बातमी दिली आहे. या वेबसाईटने मस्क यांनी संपर्क साधलेल्या काही लोकांचीही भेट घेतली आहे. रॉस गर्बर यांच्या वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. गर्बर यांच्या कित्येक ग्राहकांची टेस्ला या कंपनीत गुंतवणूक आहे. अशा अनेक ग्राहकांना मस्क यांच्या कार्यलयाने संपर्क केल्याचं समजतंय.
या संभाव्य गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात मस्क यांनी म्हटलंय, ‘ट्विटर कंपनीच्या समभाग खरेदीची ही फॉलो-ऑन इक्विटी ऑफर आहे. आणि मस्क यांनी त्यासाठी मोजलेला दरच तुम्हाला लागू होईल.’
एप्रिल 2022 मध्ये मस्क यांनी ट्विटर खरेदी तयारी दाखवली. आणि 44 अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफरही दिली. पण, त्यानंतर त्यांनाच ही रक्कम खूप जास्त असल्याचं वाटलं. आणि आपला प्रस्ताव त्यांनी मागेही घेतला होता.
पण, ट्विटर संचालक मंडळाने त्यांना कोर्टात खेचून ती प्रक्रिया पूर्ण करायला लावली. या काळात मस्क यांनीही ट्विटरसाठी लावलेली बोली गरजेपेक्षा जास्त असल्याचं मान्य केलं होतं. पण, दीर्घ मुदतीत हे पैसेही भरून निघतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आताच्या घडामोडीबद्दल ट्विटर कंपनीची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न अनेक मीडिया कंपन्यांनी केला. पण, ट्विटरने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.