Economic Survey 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी 2022-23 आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या सेवा क्षेत्राचा विकास दर 8.4 टक्के होता. तर मागील आर्थिक वर्षात देशाच्या सेवा क्षेत्राचा विकास दर 7.8 टक्के होता. म्हणजेच 0.6 टक्क्यांची वाढ झाली असून, सेवा क्षेत्राच्या वाढीमध्ये वेग दिसून आला आहे.
सर्व्हिस सेक्टरमध्ये गती (momentum in the service sector)
भारताचे सेवा क्षेत्र हे ताकदीचे स्रोत आहे. हा स्त्रोत आणखी वृद्धींगत होणार आहे. या क्षेत्रात निर्यातीची मोठी क्षमता आहे. अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सेवा क्षेत्र खूप मजबूत स्थितीत आहे, असे आर्थिक सर्व्हेक्षणाच्या सादरीकरणात सांगण्यात आले आहे. एकीकडे आयटी क्षेत्राची वाताहत होत असताना, सर्व्हिस सेक्टरने हळूहळू वेग धरला आहे. बदलणाऱ्या स्थितीनुसार, सर्व्हिसेसची मागणी वाढणार आहे, त्यामुळे सर्व्हिस क्षेत्रात येत्या काळात मोठी वाढ दिसून येणार आहे.
सध्या डिजिटल क्षेत्र मोठे होत आहे, मात्र यात सर्व्हिस हा भाग मोठा आहे. भारतात नेहमीच सर्व्हिस सेक्टरचा आवाका मोठा होता. गेल्या काही वर्षात इतर क्षेत्रांची मक्तेदारी वाढली होती, मात्र पुन्हा एकदा सर्व्हिस सेक्टरला गती मिळत आहे. अनेक व्यवसाय हे सर्व्हिस कंपन्यांवर अवलंबून आहेत. तसेच, भारत विविध वस्तूंची निर्यात वाढवणार आहे, त्यामुळे सर्व्हिस कंपन्यांना चांगली संधी मिळणार आहे, त्यामुळे येत्या वर्षात सर्व्हिस सेक्टर जीडीपीमध्ये मोठे योगदान देईल अशी आशा, अर्थमंत्री सीतारमण यांनी व्यक्त केली आहे.
आर्थिक सर्वेक्षणापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “देशातील 11 कोटी छोटे शेतकरी हे माझ्या सरकारचे प्राधान्य आहे. हे छोटे शेतकरी अनेक दशकांपासून सरकारच्या प्राधान्यापासून वंचित होते. आता त्यांना मजबूत आणि समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ते म्हणाले की, लहान शेतकऱ्यांसाठी पीक विमा, मृदा आरोग्य कार्ड, किसान क्रेडिट कार्डचा प्रसार वाढवण्याबरोबरच सरकारने प्रथमच पशुपालक आणि मच्छीमारांनाही किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेशी जोडले आहे.
अर्थसंकल्प 2 भागात चालेल. 13 फेब्रुवारीला पहिला भाग पूर्ण होईल. तर दुसरा भाग 12 मार्चपासून सुरू होईल आणि 6 एप्रिल 2023 पर्यंत चालेल. यादरम्यान 27 दिवस संसदेत कामकाज होणार आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            