अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) यांनी मंगळवारी संसदेच्या पटलावर आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) मांडले. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आणि पुरवठा खंडित होऊनही, भारतातील औद्योगिक क्षेत्राने चांगली कामगिरी केली आहे, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत, औद्योगिक क्षेत्राचे एकूण सकल मूल्यवर्धित (GVA) 3.7 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या दशकाच्या पहिल्या सहामाहीत साधलेल्या 2.8 टक्क्यांच्या सरासरी वाढीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. कोळसा, खते, सिमेंट, पोलाद आणि रिफायनरी उत्पादनांसारख्या आठ प्रमुख उद्योगांचा विकास दर स्थिर आहे. ऑटो मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे चालू आर्थिक वर्षात वस्त्रोद्योग क्षेत्राचा दर मंदावला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत (Economic Survey 2023) उद्योगांना महत्त्वाचे स्थान आहे. सकल देशांतर्गत उत्पादनात त्यांचे योगदान 31 टक्के आहे आणि ते 12.1 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देते. भारतीय उद्योगांना आर्थिक वर्ष 23 मध्ये काही विलक्षण आव्हानांचा सामना करावा लागला आहे. मात्र असे असतानाही देशाचे औद्योगिक उत्पादन वाढत आहे. भारताने मोबाईल उत्पादनात जगात दुसरे आणि फार्मा उत्पादनांच्या उत्पादनात तिसरे स्थान मिळवले आहे. 2022 मध्ये, भारत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा सर्वात मोठा उत्पादक आणि प्रवासी वाहनांचा जगातील चौथा सर्वात मोठा उत्पादक देश बनला.
ऑटोमोबाईल
2022 मध्ये, भारत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा सर्वात मोठा उत्पादक आणि प्रवासी वाहनांचा जगातील चौथा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनात ऑटोमोबाईल क्षेत्राचा वाटा 7.1 टक्के आहे. आर्थिक सर्वेक्षणानुसार, 2030 पर्यंत देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ 49 टक्के CAGR ने वाढण्याची अपेक्षा आहे. 2030 पर्यंत भारतात ईव्हीची विक्री वार्षिक 10 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ईव्ही उद्योगातून 2030 पर्यंत 5 कोटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
फार्मा क्षेत्रात भारताचा तिसरा क्रमांक
आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारताच्या औषध उद्योगाने जागतिक स्तरावर आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. भारत औषध उत्पादनांच्या उत्पादनात जगात तिसरा आणि मूल्याच्या बाबतीत 14 व्या क्रमांकावर आहे. 60 टक्के बाजार हिस्सेदारीसह भारत हा जागतिक स्तरावर अग्रगण्य लस उत्पादक देश आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत फार्मा क्षेत्रातील एकत्रित एफडीआय 20 बिलियन डॉलर पेक्षा जास्त होते.
सतत वाढणारा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग
भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योग सातत्याने वाढत आहे. मोबाईल फोन आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन वाढत आहे. मोबाईल फोन क्षेत्रात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे. 2015 च्या आर्थिक वर्षात भारतात 60 दशलक्ष मोबाईल फोन बनवले गेले होते, तर 2022 मध्ये ही संख्या 310 दशलक्ष झाली आहे.