सध्या संपूर्ण जगात आर्थिक मंदीचे वातावरण दिसून येत आहे. याचा फटका मोठमोठ्या नामांकित कंपन्यांना बसायला सुरुवात झाल्याने अनेक कंपन्यांनी नोकरकपात करायला सुरुवात केली. यामध्ये Amazon, Twitter आणि Meta सारख्या मोठ्या कंपन्यांनी देखील कर्मचारी कपात केली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयफोन तयार करणारी 'Apple' कंपनी कर्मचारी कपात करणार असल्याची बातमी ऐकायला मिळाली होती. त्यानंतर आता बंगळुरमधील क्विक ग्रोसरी डिलेव्हरी करणारी 'Dunzo' कंपनी कर्मचारी कपात करणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार पाहायला मिळत आहे.
300 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार बंगळुरू मधील स्टार्टअप कंपनी 'Dunzo' दुसऱ्यांदा कर्मचारी कपात करणार असल्याची बातमी समोर आली आहे. ही कंपनी रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून चालवण्यात येते. लवकरच ही कंपनी एकूण कर्मचारी संख्येपैकी 30 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरकपात करणार आहे.
30 टक्क्याच्या हिशोबाने या कंपनीतील 300 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यात डंझोने आपल्या टीमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी टीम रचना आणि नेटवर्क डिझाइनवर लक्ष केंद्रित केले. 'Dunzo' त्यांचे 50 स्टोअर्स बंद करून सुपरमार्केट आणि व्यापाऱ्यांशी थेट जोडले जाणार आहे. यामुळे खर्चात कपात करावी लागेल असे सांगितले जात आहे. या सर्व कारणामुळे कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही
Dunzo कंपनी सध्या देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू, गुरुग्राम, पुणे, हैद्राबाद आणि चेन्नईमध्ये सेवा देत आहे. Dunzo कंपनीचे संस्थापक आणि सीईओ कबीर बिस्वास (Founder & CEO Kabir Biswas) यांनी 5 एप्रिल रोजी टाऊनहॉल येथे कर्मचाऱ्यांची एक मिटिंग घेतली होती. या मीटिंगमध्ये कर्मचारी कपातीच्या बाबतीत माहिती देण्यात आली. मात्र कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
जानेवारीमध्ये केली होती नोकरकपात
मागील वर्षात नोव्हेंबर महिन्यात कंपनीने दिल्ली येथील काही स्टोअर्स बंद केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात 20 ते 25 टक्के कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. या कर्मचाऱ्यांमध्ये हंगामी आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.
Source: www.abplive.com