Farming Business: गेल्या काही वर्षांपासून देशातील शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयोग करत आहेत. शेतकरी पारंपरिक शेती सोडून नवनवीन प्रयोग करून चांगले पैसे कमवत आहेत. सध्या काळ्या टोमॅटोची शेती, मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. या टोमॅटोचा रंग काळा असतो, मात्र आतून तो लाल रंगाचाच असतो. सध्या, तुरळक ठिकाणी या टोमॅटोची शेती लोकप्रिय होत आहे आणि याला बाजारातून मागणीही मिळत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी फूड ट्रेंड भारतात येत आहेत, तसेच हेल्थी, ऑरगॅनिकच्या नावाखाली विविध पदार्थ बाजारात येत आहेत, त्यानुसार शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. यात काळे तांदूळ, काळी हळद याच्या शेतीचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. याची मुख्यत्त्वे निर्यात होते, तसेच या पदार्थांची मागणी एलीट क्लासमधूनच मोठ्या प्रमाणात होत असते. याच धर्तीवर आता युएसमधून भारतात आलेला टोमॅटोंचा ट्रेंड म्हणजे, काळे टोमॅटो! काळ्या टोमॅटोची लागवड इंग्लंडमधून सुरू झाली. ज्याला इंग्रजीत इंडिगो रोज टोमॅटो म्हणतात. युरोपियन बाजारात त्याला सुपरफूड म्हणतात. लाल टोमॅटोप्रमाणेच काळ्या टोमॅटोचीही लागवड केली जाते. या प्रकारच्या शेतीसाठी उष्ण हवामान आवश्यक असते. भारतातील बहुतांश क्षेत्र काळ्या टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य आहे. त्यासाठी जमिनीचा पीएच 7 (pH 6-7) असावा लागतो. काळ्या टोमॅटोच्या लागवडीसाठी जानेवारी हा खूप चांगला महिना आहे. जेव्हा या काळ्या टोमॅटोची लागवड केली जाते, तेव्हा त्यांचे उत्पादन मार्च-एप्रिलपासून सुरू होते, याला लाल टोमॅटोच्या लागवडीइतकाच खर्च येतो.
साखर, कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त (Useful in reducing sugar, cholesterol)
या प्रकारच्या शेतीमध्ये फक्त बियाणांचा खर्च जास्त असतो. तरी, त्याच्या उच्च विक्री किंमतीमुळे, ही किंमत अगदी सामान्य दिसते. नफ्याबद्दल बोलायचे झाले तर काळ्या टोमॅटोच्या लागवडीवर झालेला सर्व खर्च काढून हेक्टरी 4 ते 5 लाखांचा नफा होतो. याशिवाय त्याच्या पॅकेजिंग आणि ब्रँडिंगद्वारे नफा वाढवता येतो.
काळे टोमॅटो जास्त काळ ताजे ठेवता येतात. काळ्या रंगामुळे आणि विविध पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने, याला बाजारात चांगली किंमत मिळते. हे टोमॅटो बाहेरून काळे आणि आतून लाल असतात. तसेच, ते खाण्यास फारसे आंबट किंवा गोडही नाही. वजन कमी करण्यापासून साखरेची पातळी कमी करण्यापर्यंत आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात, असे सांगितले जाते.