मागच्याच महिन्यात आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचा किंवा बँक खात्यात जमा करण्याचा ऑप्शन नागरिकांना देण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना 2,000 रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा किंवा बदलून घेता येणार आहे. आरबीआयची गुरुवारी पतधोरण संबंधी बैठक झाली. या बैठकी दरम्यान, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नागरिकांना काही सूचना केल्या आहेत. 2,000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीची वाट पाहू नये असे त्यांनी म्हटले आहे. तसेच वेळ मिळेल तसे खातेधारकांनी त्यांचे पैसे बदलून घ्यावेत असे देखील ते म्हणाले आहेत.
घाईगडबड करू नका
गेल्या काही दिवसांपासून 2000 रुपयांच्या नोटेसंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. वेगवगेळ्या अफवा देखील पसरवल्या जात आहेत. यावर बोलताना RBI गव्हर्नर म्हणाले की, रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे चलनाचा तुटवडा नाहीये. 2000 रुपयांच्या नोटा बदलवून देण्यासाठी आरबीआयकडे पुरेशा नोटा आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाहीये आणि पैसे बदलून घेण्यासाठी शेवटच्या मुदतीची वाट बघू नये असे देखील ते म्हणाले आहेत.
#WATCH | "...Since the third week of May, the decline in currency in circulation and pick up in govt spending have expanded system liquidity. This has got further augmented due to the RBI's market operations and the deposit of Rs 2000 banknotes in the banks," says RBI Governor… pic.twitter.com/j555Xz0u4S
— ANI (@ANI) June 8, 2023
2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी बँकेकडे चलनाचा तुटवडा होऊ शकतो आणि नागरिकांना त्यांचे पैसे बदलवून मिळणार नाहीत अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमधून पसरवल्या जात होत्या. याबाबत स्पष्टीकरण देऊन नागरिकांना शक्तीकांत दास यांनी दिलासा दिला आहे.
RBIने याआधीच जाहीर केले आहे की 2,000 च्या नोटा बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर 2023 आहे. मात्र, त्या तारखेनंतरही या नोटा कायदेशीर निविदा म्हणून कायम राहणार आहेत. म्हणजेच चलन म्हणून जरी या नोटा व्यवहारात नसल्या तरी त्याची कायदेशीर मान्यता मात्र कायम असणार आहे.
1,000 च्या नोटा नाहीच!
गेल्या काही दिवसांपासून आरबीआय 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा सुरु करणार असून 500 रुपयांच्या नोटांची अतिरिक्त छपाई करणार असल्याचे बोलले जात होते. यावर स्पष्टीकरण देताना आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, RBI ने 500 च्या नोटा काढण्याचा किंवा 1,000 च्या नोटा पुन्हा सुरू करण्याचा विचार केलेला नाही.
2,000 च्या सुमारे 50% नोटा जमा
31 मार्च 2023 पर्यंत, 2000 च्या एकूण 3.62 लाख कोटी नोटांपैकी, सुमारे 50% नोटा म्हणजेच 1.80 लाख कोटी नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत, अशी माहिती खुद्द आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. जमा झालेल्या नोटांपैकी 85% नोटा बँकेत ठेवी म्हणून परत आल्या आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.