Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Tips: जास्त पैसे नाहीत? 'या' सरकारी योजनामध्ये करा फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक

Investment Tips: जास्त पैसे नाहीत? 'या' सरकारी योजनामध्ये करा फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक

Image Source : www.navi.com

Investment Tips: भविष्यकाळ सुरक्षित करण्याच्या उद्देशानं अनेकजण विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. अनेकवेळा पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे गुंतवणूक करण्याची इच्छा असूनही ती करता येत नाही. अशा परिस्थितीत कमी रकमेच्या गुंतवणुकीचे कोणते पर्याय आहेत, याविषयी आम्ही सांगणार आहोत.

गुंतवणूक (Investment) ही महत्त्वाची असते. कारण भांडवल गुंतवणुकीतूनच निर्माण करता येतं. गुंतवणूक हा शब्द ऐकून लोकांना असे वाटते की त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करण्यास सांगितले जात आहे. पण ते तसे नाही. जर तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकत नसाल, तर तुम्ही थोड्या रकमेतूनच गुंतवणूक सुरू करू शकता. अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही फक्त 500 रुपये किंवा त्याहून कमी रकमेची गुंतवणूक सुरू करू शकता.

पीपीएफ (PPF)

पीपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी होय. ही एक सरकारी योजना आहे. यात 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येईल. दरवर्षी किमान 500 रुपये गुंतवणं गरजेचं आहे. या योजनेत 7.1 टक्के दरानं चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. 15 वर्षांनी स्कीमची मॅच्युरिटी होते. दरमहा 500 रुपयांच्या हिशोबानं वार्षिक 6000 रुपये जमा करावे लागणार आहेत. म्हणजेच 15 वर्षांमध्ये तुम्ही याद्वारे 1,62,728 रुपये जोडू शकाल. तर ही योजना आणखी 5 वर्षे सुरू ठेवली तर 20 वर्षांत 2,66,332 रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिस आरडी (Post office RD)

पोस्ट ऑफिस आरडी 5 वर्षांसाठीची स्कीम आहे. सध्या यावर 6.5 टक्के दरानं व्याज मिळतं. तुम्ही यात 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. मात्र तुम्ही प्रति महिना 500 रुपये दरानं वार्षिक 6000 रुपये जमा केले तर तुमची एकूण गुंतवणूक 30,000 रुपये होईल. यावर तुम्हाला 5,498 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 35,498 मिळतील.

एसआयपी (SIP) 

एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यात चक्रवाढीचा लाभ मिळतो आणि सरासरी १२ टक्के परतावा मिळतो. अनेकजण दीर्घकाळात एसआयपीद्वारे भरपूर नफा कमावतात. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम कधीही वाढवू शकता. यामुळे तुमचा नफा अधिक होतो. तुम्ही यामध्ये दरमहा 500 रुपये गुंतवल्यास 15 वर्षांनंतर तुम्ही 12 टक्के व्याजदराने मॅच्युरिटी रक्कम म्हणून 2,52,288 रुपये घेऊ शकता. तर 20 वर्षांनंतर मॅच्युरिटी रक्कम 4,99,574 रुपये इतकी असणार आहे

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सरकार राबवतं. या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. सध्या या योजनेत 8 टक्के दरानं व्याज मिळते. 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे. योजना 21 वर्ष योजनेची मॅच्युरिटी असते. यात दरमहा 500 रुपयेही गुंतवलेत तर 15 वर्षांत तुम्हाला एकूण 90 हजार रुपये खर्च होणार आहेत. 15 ते 21 वर्षांच्या दरम्यान तुम्ही कोणतीही गुंतवणूक करणार नाही, परंतु तुमच्या रकमेवर 8 टक्के दराने व्याज जोडलं जाईल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 2,69,381 मिळतील.