पैशांची बचत हे सोपे काम वाटत असले तरी प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. वेगवेगळे उत्पन्न, गरजा आणि जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येकाची बचत क्षमताही वेगळी असते. मात्र, असे असले तरी बचत करणे सर्वांना शक्य आहे, खर्च करण्याच्या पद्धतीत आणि मानसिकतेत थोडा बदल केल्यास बचतीचे ध्येय सहज साध्य होऊ शकते. ते कसे करायचे हे आपण आज पाहू..
प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा
पैसे वाचवण्याची पहिली पायरी म्हणजे जागरूकता. आपण वेळोवेळी किती खर्च करतो याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. दिवसभरात किती खर्च झाला याचा हिशोब ठेवणे महत्वाचे आहे. रोज एखाद्या वहीत किंवा मोबाईल नोट्समध्ये ही नोंद करता येऊ शकते. महिन्याअखेर एकूण खर्चाचा आढावा घेऊन संपूर्ण वर्षभरात किती खर्च होईल याचे गणित मांडल्यास खर्चाचा अंदाज येईल. त्याप्रमाणे वर्षभरात किती बचत करू शकू याचे नियोजनही करता येईल.
महिन्याचे बजेट आखा
एकदा खर्चाचा अंदाज आला की त्याप्रमाणे महिन्याचे बजेट फिक्स करा. त्यामुळे अनावश्यक आणि जास्तीचा खर्च टळू शकेल. महिन्याच्या सुरुवातीलाच बचतीसाठी काही रक्कम राखून इतर खर्च भागवता येऊ शकतील. मात्र हे बजेट आखताना खालील मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.
मासिक उत्पन्न
आपले मासिक उत्पन्न किती हे लक्षात घ्या. त्यानुसार भविष्यातील खर्च आणि बचतीचे नियोजन ठरवता येईल.
मासिक खर्च
महिन्याभरात किती खर्च होतो ते लक्षात घेऊन त्याची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे.
गरजांसाठी वेगळा भत्ता
पैसे वाचवणे म्हणजे आपल्या सगळ्या गरजा कमी करणे नव्हे. अधूनमधून बाहेर खाणे किंवा चैनीच्या छोट्यामोठ्या गोष्टींसाठी काही रक्कम बाजूला ठेवू शकता. मात्र हे दरवेळेस करायचे नाही.
आपत्कालीन निधी
चैनीच्या गोष्टींप्रमाणेच आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास त्या वेळेसाठीही काही रक्कम बाजूला ठेवा. त्यामुळे बचतीच्या रकमेला हात लावायची गरज पडणार नाही.
(खऱ्या) गरजा ओळखा
आखून दिलेल्या बजेटमध्येच घर चालवायचे असेल आणि बचतीला हातही लावायचा नसेल तर काही नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. त्यातील मुख्य मुद्दा म्हणजे तुमच्या (खऱ्या) गरजा काय आहेत ते ओळखा. जे खरंच गरजेचे आहे त्यांना बजेटमध्ये प्राधान्य द्या आणि जे महत्वाचे नाही त्याकडे नंतरही पाहता येईल. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या अन्न, पाणी, वाहतूक खर्च, अशा खर्चाला बजेटमध्ये प्राधान्य द्या.
आर्थिक शिस्त
इतर महत्वाचे खर्च भागल्यावर काही पैसे उरले तरच शॉपिंग किंवा चैनीच्या इतर गोष्टींसाठी पैसे खर्च करा. गरजेच्या गोष्टीना प्राधान्य देणे, खर्चाच्या सवयी सुधारणे ही आर्थिक शिस्त जोपासण्याची गुरुकिल्ली ठरू शकेल.
सोप्या गोष्टीत आनंद शोधा
जीवनाचा आनंद घेण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याची गरज नाही. आलिशान पण न परवडणाऱ्या गोष्टींपेक्षा साध्या व सोप्या गोष्टीतला आनंद घ्यायला शिकलो की बचतही आपोआप होईल.
बाहेर खाण्याऐवजी घरच्या जेवणाचा आनंद घ्या
अन्नावर आपण मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याने बाहेरच्या जेवणावर खर्च करण्यापेक्षा घरच्या जेवणाला प्राधान्य द्या. त्यासाठी वेळ थोडा जास्त द्यावा लागेल पण बचतीच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्वपूर्ण ठरेल.
ठरावीक रकमेच्या बचतीचे लक्ष्य ठेवा
खरं सांगायचं, तर वाचवलेले पैसे कुठे वापरायचे हे माहीत नसेल पैसे वाचविण्यास प्रवृत्त करणे हे फार सोपे काम नाही. त्यामुळे एक ठरावीक कारण आणि ठरावीक रकमेच्या बचतीचे लक्ष्य समोर ठेवल्यास ध्येय गाठणे सोपे होते.
बचत खात्याचा वापर करा
एखाद्या विश्वासार्ह आणि चांगल्या संस्थेत, बँकेत बचत खाते चालू करण्याबद्दल विचार करा . अनेक बँकामध्ये बचत खात्यावर चांगला व्याजदर असतो, जे तुमच्या बचतीसाठी लाभदायकच ठरू शकेल. त्यामुळे अशा सुविधांचा लाभ घ्या.
कर्ज टाळा
महत्वाची बाब म्हणजे कर्ज घेणे टाळा. एखादी खरेदी अनावश्यक असेल तर त्यासाठी क्रेडिट कार्ड वापरून खर्च करू नका. गरज नसेल तर बँकेकडूनही कर्ज घेणे टाळा.
अनावश्यक खरेदी टाळा
एखाद्या अनावश्यक खरेदीसाठी क्रेडिट कार्ड तर नाहीच पण रोख रक्कमही खर्च करू नका. गरजेपेक्षा जास्त खर्च करू नका आणि बजेटवर कायम रहा. तुमची खरी गरज आणि चैन यातील फरक नेहमी लक्षात ठेवून त्यानुसारच खर्च करा. अन्यथा बचतीवर परिणाम होऊ शकतो.
बचतीच्या पैशाचेही योग्य वाटप करा
बचत खात्यात फक्त पैसे जमा करत राहणे महत्वाचे नाही तर त्याचे योग्य नियोजन आणि वाटपही तितकेच गरजेचे आहे. बचतीचे पैसे भविष्यातील कुठल्या खर्चासाठी ठेवले आहेत हे ध्येय निश्चित करा. उदा - बचतीच्या रकमेपैकी 25% रक्कम वाहनासाठी तर 25% घरासाठी, 25% उद्योगासाठी असे वाटप करून ठेवू शकतो.
वरील सर्व मुद्यांचे पालन करतानाच योग्य विचारसरणीही तितकीच महत्वाची आहे. बचतीचे ध्येय गाठण्यासाठी ठाम मनोनिग्रह गरजेचा आहे. अल्पकालीन आनंद मिळवण्यासाठी दीर्घकालीन आनंद नजरेआड करू नका. ध्येयावर ठाम रहा.