बचत नियम
३० दिवसांचा बचत नियम अगदी सोपा आहे. पुढल्या वेळेस जेव्हा तुम्ही पटकन एखादी वस्तू खरेदी करायला जाल तेव्हा तत्क्षणी थांबा आणि (त्या खरेदीपूर्वी) ३० दिवसांचा अवधी घ्या. ३० दिवसांनंतरही जर तुम्हाला ती वस्तू हवी असेल तर जरूर खरेदी करा. बचतीसाठी हा नियम हमखास लागू पडतो, कारण जेव्हा आपण अनावश्यक खरेदी करण्यापासून (स्वतःला) रोखतो तेव्हा त्यातील मानसिक गुंतवणूकही कमी करतो. यामुळे आपण आपल्या गरजा आणि चैन यातला फरक ओळखून त्याप्रमाणे बचतीचा मार्ग आखू शकतो.
पैसे वाचवणे हे सोपं काम नसलं तरी ते इतकं कठीणही नाही. घरासाठी बचत असो किंवा अत्यावश्यक खर्चासाठी काही रक्कम बाजूला काढणे असो, दर महिन्याला बचतीसाठी एक ठराविक रक्कम बाजूला काढणे आव्हानात्मक ठरू शकते. आपला खर्च कितीही मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी एखाद्या क्षणी पटकन केलेल्या खरेदीमुळे पुढचं सगळं गणित कोलमडू शकतं.
मात्र यावरही एक उपाय आहे. कोणता? ३० दिवसांच्या बचतीचा... हा अगदी साधा सोपा नियम आहे. यामुळे अनावश्यक खर्च तर टळतीलच आणि बचतही वाढेल. हे कसं करायचं? तेच तर आपण वाचणार आहोत.
काय आहे हा नियम?
३० दिवसांची बचत हा नियम म्हणजे एक साधी युक्ती आहे ज्यामुळे कोणालाही पैशाचं नियोजन सुलभतेने करता येऊ शकेल.
पुढल्या वेळेस जेव्हा तुम्ही पटकन एखादी (अनावश्यक) वस्तू खरेदी करायला जाल तेव्हा तत्क्षणी थांबा. ऑनलाइन खरेदी असेल तर ती विंडो बंद करा किंवा दुकानात असाल तर लगेच बाहेर पडा. त्याक्षणी ती वस्तू बिलकूल घेऊ नका. यामुळे आपण अनावश्यक खरेदी ३० दिवसांसाठी पुढे ढकलतो. अनावश्यक वस्तूंवर खर्च करण्याऐवजी त्याबद्दल ३० दिवस विचार करा. मात्र ३० दिवसांनंतरही जर तुम्हाला ती वस्तू हवी असेल तर बिनधास्त करा खरेदी! पण जर तेवढ्या काळात तुम्हाला त्याचा विसर पडला किंवा त्याची (वस्तू) गरज वाटलीच नाही तर आपोआपच तुमची बचत होईल. सोप्पयं ना?
हा नियम खरंच खूप फायदेशीर आहे, त्याने बचत होतेच. किंबहुना याच्या साधेपणातच त्याची खासियत दडलेली आहे. अनावश्यक खरेदीला काही काळ चाप लावून त्यातील मानासिक गुंणतवणूक कमी केल्याने खर्चाला आळा तर बसतो पण बचतही वाढते.
मात्र यासाठी ठाम मनोनिग्रहाची गरज आहे. ठरवल्याप्रमाणे ती वस्तू घेण्यापासून (स्वतःला) ३० दिवस रोखू शकलात तर या धोरणाचा वापर करून तुमची बचत वाढेल हे नक्की. अनावश्यक खरेदीमुळे आपल्याला ना खरा आनंद मिळतो ना काही फायदा होतो. ३० दिवसांच्या बचतीच्या नियमामुळे याच गोष्टीना आळा बसतो. बचत करण्यासाठी मोठमोठ्या योजना आखण्याची नव्हे तर फक्त आपल्या खर्चावर मर्यादा ठेवण्याची गरज असते.
फक्त ३० दिवस थांबल्याने आपल्याला खरंच किती फायदा होतो आणि साध्या जीवनशैलीतही आपण किती सहज राहू शकतो याचा प्रत्यय आला तर आपलं आपल्यालाच आश्चर्य वाटेल.
३० दिवसांचा बचत नियम कसा वापराल?
1. चैन आणि गरजेतला फरक ओळखा
आवश्यक आणि अनावश्यक खरेदीतला फरक ओळखा त्यामुळे खरी गरज कशाची आहे हे लक्षात येईल. मासिक खर्चाची यादी करून त्यात आवश्यक वस्तूंना प्राधान्य द्या. इतर सर्व चैनीच्या वस्तूंसाठी ३० दिवस थांबण्याचा नियम लागू करा. खरेदीला बाहेर पडल्यावर ही खरेदी गरज आहे की चैन यावर पुन्हा विचार करून योग्य निर्णय घ्या. जर खरेदी अनावश्यक असेल तर ती टाळा आणि बचत करा.
या नियमाचा आणखी एक फायदा म्हणजे एखाद्या गोष्टीवर (महागडा फोन, शूज) तुमचे कष्टाचे पैसे खर्च (३० दिवसानंतर) करण्यापूर्वी बचत (व त्यावरील व्याज) वाढवण्याची संधी मिळते. नियमित बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी जास्त व्याजदर असलेल्या बचत खात्यात पैसे ठेवल्यास फायदाच होतो.
3. मनोरंजनासाठी काही पैसे बाजूला ठेवा
हे सगळं जरी खरं असलं तरी दर खरेदीपूर्वी ३० दिवस वाट पाहणं हे वाटतं तितकं सोपं नाही. प्रत्येक वेळी खर्चावर खूप मर्यादा घातल्या तर त्याचे पालन करणं कठीण होऊ शकतं. मोठमोठ्या खर्चांसाठी हा नियम लागू करणे योग्य आहे. पण चित्रपट पहायचा असेल किंवा अजून काही, अशा छोट्या खर्चांसाठी दरवेळेस वाट पाहणे गरजेचे नाही.
३० दिवसांच्या या नियमामुळे किती बचत होते आणि तो किती फायदेशीर ठरतो याचा अनुभव नक्की घ्या.