बँक खात्याचे अनेक प्रकार आहेत. बचत (Saving), चालू (Current) आणि वेतन (Salary) खाते. बचत खाते व्यक्तिगत असते, चालू खाते हे व्यावसायिक, व्यापारी किंवा उद्योजकांसाठी तर वेतन खाते हे नोकरदार वर्गांसाठी असते. वेतन खात्याचे नियम हे अन्य बचत खात्याच्या तुलनेत वेगळे असतात. वेतन खात्यात जोपर्यंत सॅलरी नियमित जमा होते. तोपर्यंत खात्याशी निगडीत काही विशेष लाभ देखील खातेदारास मिळतात.
दरमहा वेतन जमा होत असलेल्या खात्यास सॅलरी अकाउंट म्हणजेच वेतन खाते म्हणतो. हे खाते कंपनी, कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार सुरू केले जाते. कंपनीच्या प्रत्येक कर्मचार्याच्या नावाने खाते असते आणि त्याचे संचालन कंपनीच करत असते. कंपनीच्या सूचनेनुसार बँक कर्मचार्यांच्या खात्यात दरमहा सॅलरी जमा करत असते. सॅलरी अकाउंटवर लागू असणारे नियम अन्य बचत खात्याच्या तुलनेत खूच वेगळे असतात.
किमान शिलकीची गरज नाही: वेतन खाते हे सामान्यापणे कंपनीकडून कर्मचार्यांना वेतन देण्यासाठी सुरू केले जाते तर बचत खाते हे पैशाची बचत करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर सुरू केले जाते. सॅलरी अकाउंटमध्ये कोणत्याही किमान शिलकीची गरज भासत नाही. तर बचत खात्यात मात्र आपल्याला किमान रक्कम ठेवावी लागते. ही रक्कम 500 पासून ते 10 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
वेतन नियमित असणे गरजेचे: ठराविक काळापर्यंत वेतन खात्यात जमा झाली नाही तर बँकेकडून त्या खात्याचे बचत खात्यात परिवर्तन केले जाते. यासाठी किमान शिलकीची गरज भासते. दुसरीकडे जर बँकेने मंजुरी दिली तर आपल्या बचत खात्याला वेतन खात्यात बदल करता येतो. आपण जेव्हा नोकरी बदललेली असेल आणि कंपनी देखील बचत खाते असलेल्या बँकेतच सॅलरी खाते सुरू करण्याबाबत सांगत असेल तर अशावेळी बचत खात्याचे सॅलरी खात्यात बदल करता येऊ शकते.
दोन्ही खात्याचे व्याजदर समान : वेतन आणि बचत खात्यावर मिळणारे व्याज सारखेच असते. आपल्या वेतन खात्यावर किमान चार टक्क्यांपेक्षा अधिक व्याज दिले जाते. कंपनीकडून वेतन घेणारा व्यक्तीच कॉर्पोरेट सॅलरी खाते हाताळू शकतो.
वेतन न आल्यास किमान शिल्लक आवश्यक: आपण नोकरी बदलली आणि आपण सॅलरी खाते बंद केले नसेल किंवा बदलले नसेल तर त्यात किमान शिलक ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा बँकांकडून आपल्याला देखभालीचे शुल्क किंवा दंड आकारणी केली जाऊ शकते.