आब्देल घाडिया (Abdel Ghadia) हा आहे ऑस्ट्रेलियातला उगवता रॅप गायक (Rapper). तरुणांमध्ये स्लिमी या नावाने तो ओळखला जातो. चार दिवसांपूर्वी त्याच्या बँक खात्यावर ध्यानीमनी नसताना 7,60,000 ऑस्ट्रेलियन डॉलर जमा झाले. बँकेच्या ऑनलाईन ट्रान्सफर (Online Bank Transfer) पद्धतीने हे पैसे त्याच्या बँक खात्यात आलेले स्पष्ट दिसत होते.
पण, घाडियाने असा कुठलाही व्यवहार केलेलाच नव्हता. पण, पैसे आलेत म्हटल्यावर घाडियाने ते खर्च करून टाकले. यातल्या सुमारे 5 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरचं त्याने सोनं घेतलं. आणि उरलेले पैसे पुढच्या दोन दिवसांत महागड्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करण्यावर घालवले. पण, दरम्यानच्या काळात बँकेनं पोलीस तक्रार केली. आणि त्यांची चौकशी सुरू झाली होती.
ते पैसे एका वृद्ध दांपत्याने घर खरेदीसाठी ट्रान्सफर केले होते. आणि बँक अकाऊंट चुकल्यामुळे ते घाडियाच्या खात्यावर जमा झाले. पण, पैसे कुठून आलेत हे न समजून घेता खर्च केल्यामुळे घाडियाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी झाली. आणि आता सिडनीच्या न्यायालयाने त्याला 18 महिन्यांचा कारावास सुनावला आहे. त्याची तुरुंगातली शिक्षा सुरूही झाली आहे.
थोडक्यात, तुमच्या खात्यातही असे पैसे जमा झाले तर ते खर्च करू नका. आणि बँक अधिकाऱ्यांना वेळीच त्याची माहिती द्या. भारताबरोबरच अनेक देशांमध्ये तो गुन्हा आहे. यापूर्वी अमेरिकेतही अशीच एक घटना घडली होती. एका कॉलेजवयीन मुलीच्या खात्यात काही लाख डॉलर जमा झाले. आणि तिने न विचार करता ते खर्च केले.
भारतातही असे नजरचुकीमुळे पैसे ट्रान्सफर झाले असतील आणि तुम्ही ते खर्च केलेत तर तो गुन्हा आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून तुमच्यावर आधी दंडात्मक आणि प्रकरण गुंतागुंतीचं असेल तर तुरुंगवासाची कारवाईही होऊ शकते.