Difference between OC & CC document: तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. कोणत्याही मालमत्तेचे बांधकाम करण्यापूर्वी आणि ती मालमत्ता बांधून झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाला महानगरपालिका, नगरपालिका तसेच नगर विकास बांधकाम विभागाकडून काही परवाने घेणे आवश्यक असते. या परवान्याशिवाय ग्राहकांना मालमत्ता विक्री करण्याचा अधिकार बांधकाम व्यावसायिकाला मिळत नाही, किंवा अशी विना परवाना असलेली मालमत्ता जर खरेदी केली तर पुढे जाऊन ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी रिअल इस्टेट क्षेत्रामधील OC आणि CC या परवान्यांबद्दल नक्की जाणून घ्या.
रिअल इस्टेट कन्सलटंट श्री.संग्राम पाटील(Real Estate Consultant, Shri. Sangram Patil) यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून 'OC' आणि 'CC' हे परवाने तपासायला हवेत आणि मगच मालमत्तेची खरेदी करायला हवी असे त्यांचे म्हणणे आहे. रिअल इस्टेट क्षेत्रामधील 'OC' आणि 'CC' या परवान्यांमध्ये नक्की काय फरक आहे हे समजून घेऊयात.
'CC' म्हणजे काय?
CC म्हणजे 'बांधकाम करण्यापूर्वीचा परवाना(Commencement Certificate)' होय. एखादी इमारत/बंगला किंवा कोणतेही पक्के बांधकाम करण्यासाठी स्थानिक सक्षम यंत्रणेकडून बांधकाम व्यावसायिकास मंजुरी मिळवणे आवश्यक असते. शहरी भागांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत यांमधील नगर विकास बांधकाम विभाग ही परवानगी जमिनीची पडताळणी आणि त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर देते. ज्यामधील नियम व अटींच्या(Terms & Condition) आधारावर बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम करावे लागते.
'OC' म्हणजे काय?
OC म्हणजे 'बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला(Occupation Certificate)' होय. बांधकाम करण्यापूर्वीच्या परवान्यामध्ये(CC) बांधकाम करताना व्यावसायिकाला नियम व अटी(Terms & Condition) घालून देण्यात आलेल्या असतात. या नियम व अटींची पूर्तता जर बांधकाम व्यावसायिकाने केली तरच, स्थानिक सक्षम यंत्रणेकडून बांधकाम व्यावसायिकास मंजुरी देणारा परवाना मिळतो. याच मंजुरीच्या आधारावर व्यावसायिक ग्राहकांना मालमत्तेची विक्री करू शकतो.
बांधकाम करण्यापूर्वीचा परवाना(Commencement Certificate) आणि बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला(Occupation Certificate) असेल तरच ग्राहकांनी मालमत्ता खरेदी करावी. जेणेकरून भविष्यकाळात तुम्हाला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.