नवी दिल्लीमध्ये (New Delhi) सोमवारी पहाटे 1.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तर 1 जानेवारी ते 9 जानेवारीच्या कालावधीत सकाळचं सरासरी तापमान 4.6 अंश सेल्सिअस इतकं होतं. कमी तापमानामुळे राजधानी दिल्लीवर धुक्याची (Fog) दाट चादर आहे. आणि दैनंदिन व्यवहारांवरही त्याचे पडसाद पडले आहेत. मागच्या नऊ वर्षांतला हा तापमानाच्या दृष्टीने नीच्चांकी आठवड आहे.
धुक्यामुळे दृश्यतेचं प्रमाण कमालीचं घटलंय. दिल्लीच्या सफदरजंग भागात दृश्यता 25m इतकी होती. तर पालम भागात ती 50m इतकी होती. हे भाग विमानतळ आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ आहेत. त्यामुळे अर्थातच, दोन्ही सेवा विस्कळीत झाल्या आहेत.
सोमवारी (9 जानेवारी) शारजाहून नवी दिल्लीला येणारं एअर इंडियाचं विमान दिल्ली ऐवजी जयपूरला उतरवण्यात आलं. या व्यतिरिक्त इतर 15 सेवा उशिराने सुरू आहेत. दिल्ली विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना विमानांच्या सुधारित वेळापत्रकासाठी विमान कंपन्यांना संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे.
फ्लाईट ट्रॅकर वेबसाईटकडून मिळणारा डेटाही विमानं उशिराने धावत असल्याचंच सांगतो. तर रेल्वे सेवेवरही याचा परिणाम जाणवत आहे. दिल्लीला येणाऱ्या 29 ट्रेन दोन ते पाच तास उशिरा धावत आहेत. आणखी दोन दिवस राजधानी दिल्लीत हवामान असंच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
तापमान सेल्सिअस अंशांमध्ये चारपेक्षा खाली गेलं की, देशात थंडीची लाट जाहीर करण्यात येते. नवी दिल्लीबरोबरच सध्या पंजाब, राजस्थानचा उत्तरेकडचा भाग तसंच बिहार, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्येही तापमान खाली आलं आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            