क्रिप्टो बाजारात (Cryptocurrency) मागच्या वर्षभरात खूप मोठी पडझड झाली आहे. प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनचं (Bitcoin) उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्यावर्षी 64,000 अमेरिकन डॉलरच्या घरात असलेला बिटकॉईन नोव्हेंबर 2022 पर्यंत 17,000 अमेरिकन डॉलरच्याही खाली पोहोचला होता. अशा मोठ्या चढउतारामुळे क्रिप्टोकरन्सीने (Cryptocurrency) गुंतवणुकीचं साधन (Asset Class) म्हणून आपली विश्वासार्हता गमावल्याचं एका जागतिक अहवालातून समोर आलं आहे.
ब्लूमबर्गने (Bloomberg) आयोजित केलेल्या एका पॉडकास्टमध्ये मॉर्गन स्टॅनली (Morgan Stanley) या जागतिक बँकेचे पोर्टफोलिओ विभागाचे संचालक जेरेड ग्रॉस (Jared Gross) यांनी त्यांचा बोलका अनुभव सांगितला. ‘क्रिप्टोकरन्सी उदयाला येत होती, तेव्हा डिजिटल सोनं म्हणून क्रिप्टोकडे पाहिलं जात होतं. आणि महागाईला आधार देईल अशी त्याच्याकडून अपेक्षा होती. पण, मागच्या दोन वर्षांत ही अपेक्षा फोल गेली आहे, ’ अस ग्रॉस क्रिप्टोविषयी बोलताना म्हणाले.
मॉर्गन स्टॅनले या त्यांच्या बँकेनं तयार केलेल्या अंतर्गत अहवालात क्रिप्टोकडे गुंतणुकीचं साधन म्हणून पाहणारे लोक किंवा संस्था आता 1% हून कमी आहेत . ग्रॉस तर असंही म्हणाले की, ‘ज्या गुंतवणूक संस्थांनी मागच्या दोन वर्षांत क्रिप्टोमध्ये गुंतणूक केली नाही, त्या संस्था आता सुटकेचा नि:श्वास सोडतायत.’
2020 आणि 2021 मध्ये क्रिप्टोकरन्सीतली गुंतवणूक वाढली होती. आणि याच काळात बिटकॉईन 50,000 अमेरिकन डॉलर इतका वर गेला. यामागे एक कारण जगभरातले अनेक प्रसिद्ध व्यक्ती, उद्योजक यांनी क्रिप्टोकरन्सीची केलेली तारीफ, यात एकेकाळचे जगातले सगळे श्रीमंत उद्योजक एलॉन मस्कही आले. या लोकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे क्रिप्टोमध्ये गुंतवणूक वाढली. पण, कोव्हिड नंतर आणि जागतिक स्तरावर व्याजदर वाढत असताना क्रिप्टोमधली घसरण वाढली आहे.