Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Crypto Market मध्ये RBI Governor म्हणतात तसं आर्थिक संकट खरंच निर्माण होईल का?

Cryptocurrency

अलीकडेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातलं संभाव्य मोठं आर्थिक संकट क्रिप्टो बाजारातून येऊ शकेल अशी भीती व्यक्त केली होती. याची शक्यता खरंच किती आहे? क्रिप्टोमधल्या तज्ज्ञांना हा आरोप मान्य आहे का?

‘देशातलं पुढचं संभाव्य आर्थिक संकट (Financial Crisis) हे क्रिप्टोकरन्सीमुळे (Cryptocurrency) येऊ शकेल,’ असं वक्तव्य अलीकडेच रिझर्व्ह बँंकेचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikant Das) यांनी एका खाजगी कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या विधानावर अपेक्षेप्रमाणेच वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यापूर्वीही शक्तिकांत दास यांनी वेळोवेळी आभासी चलन (Virtual Currency) बाजाराबद्दल अविश्वास व्यक्त केला आहे. या चलनावर सरकारी नियंत्रण नाही ही गोष्ट त्यांनी वारंवार अधोरेखित केली आहे.    

याच आठवड्यात झालेल्या बिझिनेस टुडेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीवर बोलताना त्यांनी खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणली पाहिजे, अशी भूमिकाच जवळ जवळ मांडली. त्यांच्यापासून देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका आहे. आणि तो कमी करायचा असेल तर निदान त्यांच्यावर सरकारी नियंत्रण हवं, या मताचे गव्हर्नर आहेत.   

पण, याविषयी देशातल्या इतर अर्थतज्ज्ञांना नेमकं काय वाटतं?    

गो-सॅट्स या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुंतवणूक करणाऱ्या कंपनीचे संस्थापक महम्मद रोशन यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ‘अर्थव्यवस्था उभी राहिली. चलन व्यवस्था आली तेव्हापासून आर्थिक घोटाळ्याची शक्यता नेहमीच होती. तितकीच ती क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतही आहे,’ असं रोशन यांचं म्हणणं आहे.    

पण, त्याचबरोबर क्रिप्टो व्यवहारांवर सरकारी नियंत्रण हवं असंही त्यांनी मान्य केलं. ‘सरकारी नियंत्रण असेल तर घोटाळे कमी करता येतील. निदान त्यांचे परिणाम तरी आटोक्यात ठेवता येतील,’ असं ते म्हणाले.    

रोशन यांच्याप्रमाणेच या क्षेत्रात काम करणाऱ्या इतरही तज्ज्ञांचं मत आहे. एकट्या क्रिप्टोकरन्सीमुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान होऊ शकत नाही. उलट क्रिप्टोकरन्सी या एका आर्थिक व्यवस्थेच्या भाग आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत काही विपरित घडलं तर त्याचा परिणाम मात्र इतर घटकांइतकाच क्रिप्टोकरन्सीवर होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.    

2022 हे वर्षं क्रिप्टोकरन्सीसाठी जागतिक स्तरावर मंदीचं ठरलं आहे. आणि आतापर्यंत लोकांचे 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके पैसे मातीमोल झाले आहेत. FTX सारखं मोठं क्रिप्टो एक्सचेंज बंद झालं. तर ल्युना ही क्रिप्टेकरन्सीच बंद झाली.    

पण, इतकं जागतिक पातळीवर घडलेलं असताना जागतिक स्तरावरही त्याचा कितीसा परिणाम झाला? कोव्हिड नंतर जगभरात पसरलेल्या मंदीच्या वातावरणात क्रिप्टमधली घसरण हा एक भाग होता. जागतिक मंदीला क्रिप्टो किंवा इतर कुठलीही एकच गोष्ट अवलंबून नव्हती. तसंच आताही आहे, असं या तज्ज्ञांचं मत आहे.    

हा मुद्दा विस्ताराने सांगताना महम्मद रोशन म्हणतात, ‘अर्थव्यवस्थेत काही त्रुटी राहतात आणि त्याचा गैरफायदा स्वार्थी लोक घेतात, तेव्हा आर्थिक संकट उभं राहतं, असं आतापर्यंतचा इतिहास सांगतो. त्यासाठी फक्त क्रिप्टोकरन्सी जबाबदार असणार नाही. आणि अनेकदा असं संकट येतं तेव्हा अनेक गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात.’    

रोशन यांनी आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी कोव्हिडनंतर आलेल्या मंदीचंच उदाहरण दिलं. ‘राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता, कर्जाचं अनैसर्गिक प्रमाण, कर्जाची परतफेड न होणं आणि याच्या जोडीला आलेलं एखादं कोरोनासारखं नैसर्गिक संकट यातून आताचं आर्थिक संकट उभं राहिलं. आहे. आताच्या आर्थिक संकटाला एकटं दुकटं कारण नाही. तसंच संभाव्य आर्थिक संकटालाही एकटी क्रिप्टोकरन्सी जबाबदार असणार नाही.’ असं रोशन म्हणाले.    

या जोडीला लोकांमध्ये निर्माण झालेली हावही घोटाळ्यासाठी कारण ठरते, असं त्यांचं म्हणणं आहे.    

जगभरात या घडीला 153 क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. या व्यतिरिक्त 5,886 क्रिप्टोकरन्सी अशा आहेत ज्यांमधले व्यवहार छोटे आहेत.