पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कालबद्ध योजना तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
जप्त मालमत्तेचा लिलाव करून पैसे वसूल करा
पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील (Pen Urban Bank) आर्थिक गैरव्यवहारांमुळे ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत गरिबांचे पैसे परत मिळाले पाहिजे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले आहेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करा, तसेच जप्त मालमत्तांचा लवकरात लवकर लिलाव करून पैसे वसूल करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पेण अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील ठेवीदार आणि खातेदार संघर्ष समितीच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली होती. बॅंकेच्या ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपली तरीही त्या परत मिळण्याची शक्यता नव्ह्ती. त्यामुळे या ठेवींमधून घेतलेल्या ३९ मालमत्ता गृह विभागाने जप्त केल्या. महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. ठेवीदारांच्या पैशांमधून घेतलेल्या जागा सिडकोने खरेदी करुन ठेवीदारांचे पैसे परत देण्याचा एक पर्याय याविषयी असून त्या दृष्टीने या जागांचे सिडकोने मूल्यांकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी दिले आहेत.
काय आहे प्रकरण ?
रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेतील (Pen Urban Bank) 758 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे म्हणून हे प्रकरण ओळखले जाते. यामुळे 12 वर्षांपासून लाखो खातेदारांचे पैसे अडकले आहेत. मुंबई, रायगड जिल्ह्यातील खातेदारांचे कोट्यवधी रुपये यात गुंतले आहेत.