Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2024: अंतरिम बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या? जाणून घ्या

Budget 2024

Image Source : https://www.pexels.com/photo/hands-of-a-person-holding-a-smartphone-6694952/

अंतरिम बजेट 2024 मध्ये सरकारकडून महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये लखपती दीदीपासून ते आयुष्मान भारत योजनेचा समावेश आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम बजेट सादर केले. या बजेटच्या माध्यमातून ‘गरीब’, ‘महिला’, ‘युवक’ आणि ‘शेतकरी यांच्या सशक्तीकरणाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले. बजेटमध्ये महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. सरकारद्वारे अंतरिम बजेट 2024 मध्ये महिलांसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, त्याबाबत जाणून घेऊयात.

नारी शक्तीवर भर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या भाषणामध्ये वारंवार नारी शक्तीवर भर दिला. तसेच, सरकारच्या योजनांचा महिलांना झालेल्या फायद्याबाबत देखील माहिती दिली. सीतारामन यांनी माहिती दिली की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 70 टक्के घरं ग्रामीण भागातील महिलांना देण्यात आली. याशिवाय, मुद्रा योजनेंतर्गत मागील 10 वर्षात महिला उद्योजकांना तब्बल 30 कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत देण्यात आल्याचे त्यांनी सांगण्यात आले. 

उच्च शिक्षणात विद्यार्थींनीच्या नोंदणीत 28 टक्के वाढ झाले आहे. तर शालेय अभ्यासक्रमामध्ये महिलांची नोंदणी 43 टक्के वाढली असून, हा आकडा जगात सर्वाधिक आहे. याशिवाय, अर्थमंत्र्यांनी अंतरिम बजेटमध्ये महिलांसाठीच्या वेगवेगळ्या योजनांचीही घोषणा केली.

लखपती दीदी योजना

सरकारने याआधी या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील 2 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे उद्देश समोर ठेवले होते. मात्र, या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी 2 कोटींचा आकडा वाढवून 3 कोटी केला आहे. याचाच अर्थ या योजनेंतर्गत 3 कोटी महिलांना वर्षाला कमीत कमी 1 लाख रुपये कमविण्यास सक्षम करणे हा सरकारचा उद्देश आहे. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण दिले जाते. महिलांना प्लंम्बिग, एलईडी बल्ब निर्मिती, ड्रोन दुरुस्ती इत्यादी कामे शिकवली जातात. जेणेकरून, ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. 

या योजनेवर एक संपूर्ण लेख येथे आहे.

महिलांसाठी लसीकरण मोहीम

माता आणि बालकांच्या काळजीसाठी सरकारकडून लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. सरकारद्वारे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवली जाईल. या अंतर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलींचे लसीकरण केले जाणार आहे.

आयुष्मान भारत योजना

अंतरिम बजेटमध्ये आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांसाठी देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांनाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे या महिला कर्मचाऱ्यांना दखील 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा फायदा मिळेल.