केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना आज देशाचे अंतरिम बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यातील प्रमुख घोषणा ही लखपती दीदी योजनेबद्दल आहे. योजनेंतर्गत महिलांना वर्षाला कमीत कमी 1 लाख रुपये कमविण्यासाठी सक्षम करणे हा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 15 ऑगस्ट 2023 ला लाल किल्यावरून भाषण करताना या योजनेची घोषणा केली होती. आता अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये या योजनेचे लक्ष्य वाढविण्यात आल्याची माहिती दिली आहे. या निमित्ताने लखपती दीदी योजना नक्की काय आहे? याबाबत जाणून घेऊया.
लखपती दीदी योजना काय आहे?
लखपती दीदी योजनेचा महिलांना कौशल्य विकास प्रधान करून वर्षाला कमीत कमी 1 लाख रुपये उत्पन्नाची कमाई करण्यासाठी सक्षम बनवणे हा आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील.
ग्रामीण भागातील महिला सक्षम बनवणे, त्यांना तंत्रज्ञानाची माहिती देणे व याचा वापर कृषि क्षेत्रासाठी करणे हा उद्देश आहे. यामुळे महिला आर्थिकदृष्टी सक्षम होतील.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत आतापर्यंत 83 लाख बचत गटांच्या माध्यमातून 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत. तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये घोषणा केली की, योजनेंतर्गत 2 कोटींवरून वाढवून 3 कोटी महिलांना लखपती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
योजनेचा फायदा कसा मिळेल?
या योजनेंतर्त महिलांना ड्रोन चालवणे, ड्रोन दुरुस्त करणे, प्लंम्बिग, एलईडी बल्ब निर्मिती, शिवणकाम असे विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे महिलांना रोजगार मिळण्यास मदत होते. योजनेंतर्गत महिलांना सूक्ष्म कर्ज देखील उपलब्ध केले जाते. जेणेकरून, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल. याशिवाय, महिलांना बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यासाठी देखील प्रोत्साहित केले जाते.
तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. योजनेंतर्गत नवीन तंत्रज्ञान हाताळण्याचे प्रशिक्षण देखील मिळते. या योजनेचा लाभ महिला बचत गटांतर्गत घेता येईल. तुम्ही महिला बचत गटाचा भाग असल्यास या योजनेचा लाभ मिळू शकतो. तसेच, अंगणवाडी केंद्रातूनही या योजनेबाबत सविस्तर माहिती मिळेल.
2024 च्या interim budget भाषणात नमूद केलेल्या महिलांसाठीच्या इतर योजना इथे पहा.